गडचिरोतील धुमश्‍चक्री : पाच नक्षलवादी ठार

गडचिरोली | पोलीस दलाचे कमांडो पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये आज जोरदार धुमश्‍चक्री सुरू असून यात पाच नक्षलवादी ठार झाले आहेत. ही चकमक अजून सुरूच असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

गडचिरोलीचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस दलाचे सी ६० कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक सुरु आहे. गडचिरोलीच्या घनदाट जंगलातील कोटगुल-ग्यारहपत्ती भागात ही चकमक सुरु आहे. चकमक अजून सुरूच असून मृतांचा आकडा आता नेमका सांगता येणार नसल्याचे गोयल म्हणाले. पण हा आकडा पाच पेक्षा जास्त असू शकतो, असे ते म्हणाले.

केंद्र सरकारने नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी गेल्या महिन्यातच उच्च स्तरीय बैठक घेतली होती. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, एनएसए अजित डोभाल आणि नक्षलग्रस्त राज्यांचे मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक या बैठकीला उपस्थित होते. यावेळी शहा यांनी नक्षलग्रस्त भागात तैनात असलेल्या आयटीबीपी आणि सीआयएसएफसारख्या इतर निमलष्करी दलांनाही नक्षलवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास आणि कारवाई करण्यास सांगितले होते. नक्षलविरोधी विशेष दल  आणि प्रभावित क्षेत्राच्या प्रमुखांना नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यासाठी आदेश देण्यात आले होते. या अनुषंगाने पोलीस दलाच्या कमांडो पथकाने आज नक्षलवाद्यांविरूध्द मोठी कारवाई केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content