पहूर येथे पतंजली आरोग्य केंद्रास आग; दीड लाखांचे नुकसान

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहुर बस स्थानक परिसरात असलेल्या पतंजली आरोग्य केंद्रात शार्ट सर्किटमुळे आग लागली असून या आगीत दीड लाखांचे नुकसान झाल्याची घटना आज दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की , बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कृषी पंडित मोहनलाल लोढा कॉम्प्लेक्स मधील जयंत जोशी यांच्या ज्ञानेश्वरी पतंजली आरोग्य केंद्रास विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली. दुकान बंद करून ते बाहेर गेले असता शेजारील कृषी केंद्र संचालक श्री. गाजरे यांना त्यांच्या दुकानातून धुर निघत असल्याचे दिसले. त्यांनी श्री. जोशी यांना फोन आला असता विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याचे निदर्शनास आले. श्री गाजरे सतीश पाटील यांच्यासह आजूबाजूच्या लोकांनी आग विझविण्यासाठी मदत केली.

या आगीत १९ हजार रुपयांच्या रोख रक्कमेसह आयुर्वेदिक औषधांचा ९५ हजार ३९५ रुपयांचा साठा जळून भस्मसात झाला. तसेच दुकानातील काउंटर व इलेक्ट्रॉनिक उपकरण यांचेही नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच संतोष चौधरी आणि श्रीराम धुमाळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यातजयंत जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली बीड हवालदार संतोष चौधरी  करीत आहेत. लॉकडाऊनमुळे आधीच व्यवसायिकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असताना या आगीमुळे श्री. जोशी यांचे मोठे नुकसान झाले आहे.

 

Protected Content