चाळीसगाव प्रतिनिधी । महायुतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या वडिलांनी भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास सूर्यवंशी यांना धमकी दिल्याचे प्रकरण पोलिसात गेल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, आमदार उन्मेष पाटील यांचे वडील भैयासाहेब बाजीराव पाटील यांनी भाजप कट्टर ग्रुप धामणगाव या व्हाटसअॅप ग्रुपमध्ये भाजपच्या किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस कैलास सूर्यवंशी यांना धमकी दिली. त्यांनी या ग्रुपमध्ये सूर्यवंशी यांना धमकावून त्यांची बदनामी करणारा मजकूर टाकला. यामुळे सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कैलास सूर्यवंशी हे माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांचे निष्ठावंत पदाधिकारी म्हणून ख्यात आहेत. ते स्वत: गत विधानसभा निवडणुकीत आमदारकीसाठी इच्छुक होते. मात्र उन्मेष पाटील यांनी पक्षाचे तिकिट मिळवून बाजी मारली. यानंतर आमदार पाटील आणि कैलास सूर्यवंशी या दोन्हींचे गट भाजपमध्ये कार्यरत असून त्यांच्यात विस्तवदेखील जात नसल्याचे अनेकदा दिसून आले होते. यातच अगदी निवडणुकीच्या तोंडावरच आमदारांच्या वडिलांनी कैलास सूर्यवंशी यांना धमकावल्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. याचे पडसाद मतदानातून उमटण्याची शक्यता राजकीय निरिक्षकांनी वर्तविली आहे.