अखेर लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारेंनी सोडले उपोषण !

जालना-वृत्तसेवा | ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी उपोषणाला बसलेले प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आज अखेर राज्य सरकारने आश्‍वस्त केल्यानंतर आपल्या उपोषणाची सांगता केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांच्या मागण्यांना विरोध करतांनाच राज्यातील ओबीसी समुदायाचे आरक्षण अबाधित रहावे म्हणून प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी देखील जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे आमरण उपोषण सुरू केले होते. मराठ्यांना ओबीसीसून आरक्षण देणे आणि सग्यासोयर्‍यांची मागणी मान्य करणे यासाठी जरांगे यांचा लढा सुरू असतांना या दोन्ही मान्यवरांनी सदर मागण्यांना प्रखर विरोध दर्शविला आहे.

दरम्यान, आज छगन भुजबळ, गिरीश महाजन, अतुल सावे, उदय सामंत आणि धनंजय मुंडे या पाच मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने आज हाके आणि वाघमारे यांची भेट घेतली. त्यांनी राज्य सरकार ओबीसींच्या हक्काला धक्का लागू देणार नसल्याची ग्वाही दिली. यानंतर प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपल्या उपोषणाची सांगता केली.

Protected Content