विवाहितने विहिरीत उडी घेतल्याप्रकरणी अखेर सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल

पाचोरा-लाईव्ह ट्रेंड न्यूज प्रतिनिधी ।  सासरच्या जाचाला कंटाळून १९ वर्षीय नवविवाहितेने विहिरीत उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची खळबळजनक घटना गुरूवारी उघडकीला आली होती. दरम्यान मयत विवाहितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या मंडळींविरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथील रहिवाशी राहुल चव्हाण याचा प्रेमविवाह लिहा तांडा ता. जामनेर येथील काजल राठोड हिच्याशी तीन महिन्यांपूर्वी झाला होता. लग्नानंतर काही दिवस चांगली वागणूक मिळाल्यानंतर काजल हीस आजल सासु सुग्राबाई चव्हाण, सासु मुक्ताबाई चव्हाण, चुलत सासु पार्वतीबाई चव्हाण ह्या किरकोळ कारणावरून टोचुन बोलत असल्याने त्यांच्यात वाद सुरू होते. सतत होणाऱ्या भांडणा मुळे राहुल चव्हाण हा १० जुलै रोजी काजल सोबत पाचोरा येथील गोविंद नगर भागात भाड्याची खोली घेऊन राहायला आला होता. दरम्यान १३ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास काजल हिने टोकाचे पाऊल उचलत घराच्या मागच्या बाजूला असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करत आपली जीवन यात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने काजल हीस पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी काजल हीस मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयात काजल हिच्या आईसह माहेरच्या मंडळींनी एकच आक्रोश करत सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून काजल हिने आत्महत्या केल्याचे बोलुन दाखविले.

 

अखेर पोलीसात गुन्हा दाखल

याप्रकरणी मयत काजल यांच्या आई रेखा प्रकाश बाजे रा. पळासखेडा काकर ता. जामनेर यांच्या फिर्यादीवरून राहुल संभाजी चव्हाण, मुक्ताबाई संभाजी चव्हाण, रवि संभाजी चव्हाण, मानाजी बद्री चव्हाण, रुपाली मानाजी चव्हाण, सुग्राबाई बद्री चव्हाण सर्व रा. कुऱ्हाड ता. पाचोरा यांचे विरुध्द पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजया वसावे ह्या करीत आहे.

Protected Content