जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । होणाऱ्या पतीने हिणवल्याने गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील रामेश्वरी रवींद्र नागपुरे- बारी हिला अखेर आज न्याय मिळाला. होणारा पती भूषण पाटील-बारी त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी अधिउक माहिती अशी कि, ‘साखरपुडा झाल्यानंतर रामेश्वरी रवींद्र नागपुरे हिला, होणारा पती भूषण ज्ञानेश्वर पाटील बारी (रा.रावेर, ह. मु. नाशिक) याने वेळोवेळी मानसिक त्रास दिला. “तू जाड, गावंढळ असून मला नापसंद आहे, मी हे लग्न मोडणार आहे.” अशी दि.२४ मार्च रोजी रात्री दमदाटी करत धमकी दिली. हा प्रकार असह्य झाल्याने रामेश्वरीने दि.२५ मार्च रोजी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणातील दोषी भूषणवर कारवाईसाठी बारी समाजाच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री गुलाबराव पाटील व पोलीस अधीक्षक मुंडे यांची भेट घेतली व रामेश्वरीला हिणवून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या भूषणवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर, माजी पालकमंत्री एकनाथराव खडसे, जिल्हाधिकारी, जिल्हा महिला आयोग व भुसावळ डीवायएसपी वाकचौरे यांनाही देण्यात आल्या होत्या.
अखेर भुसावळ तालुका पोलिसांनी आज मयत रामेश्वरी हिचे वडील रवींद्र तापीराम नागपुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी भूषणवर कलम ३०६ प्रमाणे होणारी पत्नी रामेश्वरी हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यामुळे मयत रामेश्वरीला न्याय मिळाला अशी भावना बारी समाजात पसरली असून पोलीस अधीक्षकांसह सर्वांचे बारी समाजाने आभार मानले आहेत.