अखेर ‘त्या’ अधिकाऱ्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल

खामगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । खामगाव येथील जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाविरोधात बातमी प्रसिध्द केल्यानंतर पत्रकाराला अश्‍लील भाषेत शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ‘त्या’ अधिकाऱ्यावर पत्रकार संरक्षण  कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

येथील जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाची बातमी आपल्या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित केल्याने चिडून जाऊन जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या अभियंत्याकडून फोनवरून पत्रकाराला अश्लील शिवीगाळ करत, जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसात तक्रारी देऊनही कारवाई झाली नसल्याने गेल्या ५ दिवसापासूंन खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर वृत्तपत्राच्या संपादकाकडून बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आले होते. यामध्ये जिल्हा भरातील पत्रकारांनी आंदोलनात सहभागी झाल्याने अखेर पोलिसांना या प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा लागला. यामुळे शुक्रवारी सायंकाळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांच्या हस्ते उपोषणाची सांगता करण्यात आली.

पत्रकार आकाश संतोष पाटील हे गेल्या ५ दिवसापासूंन आमरण उपोषणास बसलेले होते, त्यांनी २५ जानेवारी २०२२ रोजी ग्रामीण पाणीपुरवठा योजना खामगाव यांच्या संदर्भात आपल्या वृत्तपत्रामध्ये वृत्त प्रकाशित केले होते, यावरून चिडून जाऊन जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता व्ही. एम. चव्हाण व जाधव नामक कर्मचाऱ्याने फोनवरून पत्रकाराला अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती, या संभाषणाची ऑडियो क्लिप देखील व्हायरल झाली होती. याप्रकरणी पत्रकाराने शहर पोलीस स्टेशन खामगाव येथे तक्रार देऊनही अभियंत्याविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले नसल्याने, पत्रकार आकाश पाटील यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर मागील पाच दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. मात्र याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दिल्याच्या सव्वा दोन महिन्यानंतर उपोषणास बसण्याचा एक दिवस अगोदर आरोपी अभियंत्यावर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला होता.

मात्र पोलिस, पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत नसल्याने पत्रकार बांधवांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन देऊन तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती, त्यानुसार रात्री उशिरा पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत, हा एक प्रकारे पत्रकार एकजुटीचा विजय असून पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांनी पत्रकार आकाश पाटील यांना उसाचा रस देऊन यांच्या उपोषणाची सांगता केलीये. तर आता फरार असलेल्या आरोपीचा तात्काळ शोधून त्याला अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 

Protected Content