Home Cities जळगाव ‘चित्रपट हे प्रभावी शैक्षणिक माध्यम’ — शिक्षणाधिकारी निलेश पाटील

‘चित्रपट हे प्रभावी शैक्षणिक माध्यम’ — शिक्षणाधिकारी निलेश पाटील

0
132

 जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चित्रपट हे केवळ करमणुकीचे साधन नसून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी शैक्षणिक माध्यम ठरू शकते, असा महत्त्वपूर्ण संदेश ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी देण्यात आला. अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी यावेळी बोलताना बालवयातच साहित्य, कला आणि चांगल्या चित्रपटांची गोडी निर्माण होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सवाचा दुसरा दिवस चिमुकल्यांच्या जल्लोषात आणि सांस्कृतिक उत्साहात रंगला. यावेळी मुलांसाठी जागतिक दर्जाच्या ‘मटर पनीर’, ‘मंग्या’, ‘रिबेल’ आणि ‘देवा तुला शोधू कुठे’ या चार विशेष बाललघूचित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले. या चित्रपटांमधून मुलांना मनोरंजनासोबतच सामाजिक मूल्ये, कल्पनाशक्ती आणि संवेदनशीलतेचे धडे देण्यात आले. भाऊंचे उद्यान परिसर चिमुकल्यांच्या उपस्थितीने आणि त्यांच्या आनंदाने अक्षरशः बहरून गेला होता.

प्रमुख पाहुणे निलेश पाटील यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत चित्रपट आणि शिक्षण यांचा परस्पर संबंध स्पष्ट केला. चित्रपटांच्या माध्यमातून मुलांच्या विचारशक्तीला चालना मिळते, त्यांच्यात सर्जनशीलता विकसित होते आणि नवनवीन संकल्पनांचे आकलन सुलभ होते, असे त्यांनी सांगितले. बालचित्रपट महोत्सवांसारखे उपक्रम मुलांच्या बौद्धिक जडणघडणीत मोलाचे योगदान देतात, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अजिंठा फिल्म सोसायटीचे सचिव विनीत जोशी, बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल आणि पालकशाळेचे शैलेश शिरसाठ यांच्या हस्ते शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर डॉ. संजय हांडे, किरण सोहळे, रत्नाकर पाटील, डॉ. विद्या पाटील, शैलेश शिरसाठ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश शुक्ल यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन विनोद ढगे यांनी केले.

या महोत्सवात प्रा. जयेंद्र लेकुरवाळे यांनी गाणी, खेळ आणि संवादाच्या माध्यमातून मुलांशी संवाद साधत चित्रपटांतील मूल्यांची ओळख करून दिली. त्यामुळे बालप्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचा अनुभव अधिक समृद्ध झाला. चित्रपट हे मुलांच्या कल्पनाविश्वाला चालना देणारे माध्यम असल्याची जाणीव या उपक्रमातून प्रकर्षाने अधोरेखित झाली.

महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी कमलाकर रुगे, वर्षा उपाध्ये, पार्थ ठाकर, डॉ. अनिल भोकरे, डॉ. वीणा महाजन, डॉ. विशाखा पाटील, श्वेता जैन, मकरंद डबीर, डॉ. श्रद्धा पाटील शुक्ल, अनघा गोडबोले, सचिन महाजन, आकाश बाविस्कर, मोहित पाटील, नाना सोनवणे आणि हर्षल पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

महोत्सवाचा उद्या शेवटचा दिवस असून दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवराज अष्टक’ मालिकेतील गाजलेला ‘रणपती : आग्र्याहून सुटका’ हा चित्रपट बालप्रेक्षकांसाठी दाखविण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित हा प्रेरणादायी चित्रपट मुलांनी आवर्जून पाहावा, असे आवाहन आयोजकांनी पालकांना केले आहे.


Protected Content

Play sound