चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोनाचा प्रकोप दिवसागणिक वाढत असताना येथील ट्रॉमा केअर सेंटर अर्थात कोव्हीड रूग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांची तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. यामुळे रूग्णांची गैरसोय होत असून हि पदे तात्काळ भरण्याची मागणी जन आंदोलन खान्देश विभागातर्फे मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकारी यांना निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
चाळीसगाव शहरात कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. सद्यस्थिती अतिशय बिकट असून शहराची वाटचाल हॉटस्पॉट शहराकडे होत आहे. असे भयावह चित्र असताना येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची तुटवडा जाणवत आहे. या तुटवड्यामुळे कोरोना बाधीत रूग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी जन आंदोलन खान्देश विभागाचे अध्यक्ष गौतम निकम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री गुलाब पाटील व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे जीमेलच्या सहाय्याने दि.२ एप्रिल २०२० रोजी केली होती. मात्र रिक्त पदे अद्यापपर्यंत भरण्यात न आल्याने आज दि.२९ मार्च रोजी गौतम निकम यांनी पुन्हा जीमेल द्वारे मागणी केली आहे. दरम्यान निवेदनाचे दखल घेऊन एका फिजीशिएनची नियुक्ती करण्यात आली आहे.
मात्र ते पुरेसे नाही. सध्या तालुक्यात दहा प्राथमिक आरेाग्य केंद्रे आहेत. तर 49 उपकेंद्रे आहेत. मेहुणबारे व चाळीसगाव येथे ग्रामीण रूग्णालये असल्याने विविध विभागांतील एकूण ६० रिक्त पदे आहेत. हि पदे तात्काळ भरण्यात यावे अशी मागणी जन आंदोलन खान्देश विभागाचे प्रमुख गौतम निकम यांनी केली आहे. या निवेदनावर गौतम निकम, डॉ. एस. एम. लंवाडे, ॲड.वाडिलाल चव्हाण, शत्रुघ्न नेतकर, विजय शर्मा, विजय शर्मा, आबा गुजर बोरसे, नाशीर भाई शेख, मिलिंद अशोक भालेराव, गणेश भोई, प्रदीप चौधरी, अशोक राठोड, विजय चौधरी, आर. के. पाटील व भावराव गांगुर्डे आदींच्या सह्या आहेत.