बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बोदवड तालुक्यातील रिक्त पदे भरून रेशन इष्टांक वाढवून देण्याची मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई पवार यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
अवर्षण ग्रस्त असलेल्या बोदवड तालुक्यात शासकीय कर्मचाऱ्यांचा सुद्धा दुष्काळ पडला आहे शासकीय कार्यालयातील अनेक पदे रिक्त असल्याने तालुका वासीयांच्या अनेक कामांना विलंब होतो.अनेक नागरिक शासकीय योजनांच्या लाभा पासून वंचित राहत आहेत विशेषतः पुरवठा विभागात अनेक पदे रिक्त असल्याने गोरगरिबांना रेशनचे धान्य मिळण्या साठी अडचणी येत आहेत.ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यांकडे बोदवड येथिल पुरवठा विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी तसेच कपात केलेला इष्टांक(धान्य पुरवठा) पुन्हा पुर्ववत करण्यात यावा अशी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, बोदवड तहसिल कार्यालयातील शासकीय कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत त्यामुळे तालुक्यातील नागरिकांची शासकीय कामे खोळंबली आहेत. नागरिकांना विविध शासकीय योजनांच्या लाभा पासून वंचित राहावे लागत आहे त्यातच पुरवठा विभागात प्रामुख्याने पुरवठा निरीक्षक, गोदाम निरीक्षक, लिपिक असे एकूण सात पदे रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्यातील गोरगरीब जनतेला रेशनचे धान्य मिळण्यासाठी आणि नविन रेशन कार्ड बनवणे, रेशन कार्ड मध्ये नाव वाढविणे व कमी करणे अशा कामांसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे तालुक्यातील तहसिल व पुरवठा विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याने इष्टांक (धान्य पुरवठा) वाढविण्यात आला होता.
परंतु गेल्या काही दिवसांपासून इष्टांक नऊशे युनिट ने कमी करण्यात आलेला आहे त्यामुळे गोरगरीब जनतेचे नुकसान होत आहे तरी इष्टांक वाढविण्यात यावा अशी मागणी निवेदनात केलेली आहे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा तर्फे तहसिल कार्यालय बोदवड येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आलेला आहे.
यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या बोदवड तालुक्यातील तहसिल कार्यालय व इतर शासकीय कार्यालयातील अनेक शासकीय कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. ते भरण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा प्रशासन ढिम्म झालेले असल्याने व प्रशासनावर कोणाचा वचक राहिला नसल्याने हे पदे भरण्यात येत नाहीत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना शासकीय योजनांच्या लाभा पासून वंचित राहावे लागत आहे. पुरवठा विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे गोरगरीब गरजू नागरिकांना रेशनचे धान्य मिळण्यासाठी अडचणी येतात. गेल्या काही दिवसांपासून मंजुर इष्टांक मधील नऊशे युनिट कमी केल्याने नागरिकांचे नुकसान होते आहे. तरी प्रशासनाने रिक्त पदांवर तात्काळ कर्मचाऱ्यांची नेमणूक करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी तसेच इष्टांक वाढवून गोरगरीब जनतेला रेशनचे धान्य उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली.