दिपाली सैय्यद यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा – भाजपाचे निवेदन (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवसेना नेत्या, अभिनेत्री दिपाली सैय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी करत भारतीय जनता पार्टी जिल्हा महिला आघाडी व महानगर युवा मोर्चाच्या वतीने शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात, “गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रात सामाजिक अराजकता माजवण्याचे काम सत्ताधारी पक्ष करीत असून याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका करताना शिवसेना नेत्या दिपाली सैय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.

“त्या कारमध्ये सोमय्या काय तर मोदी असते तरी ही फोडली असती.” असे आक्षेपार्ह वक्तव्य शिवसेना नेत्या अभिनेत्री दिपाली सैय्यद यांनी केले आहे. पंतप्रधान हे पद देशाचे सर्वोच्च पद असून सुरक्षेच्या दृष्टीने तसेच देशाच्या स्वाभिमानाच्या दृष्टीने शिवसेना नेत्या दिपाली सैय्यद यांनी केलेले वक्तव्य  राष्ट्रद्रोह असून आदरणीय पंतप्रधान बद्दल वापरलेलं वक्तव्य हे निषेधार्थ आहे.

सामाजिक जीवनात तसेच कला क्षेत्रात आघाडीवर असलेल्या एका नामवंत महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्य हे देशाच्या दृष्टीने घातक असून अपमानजनक आहे. देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या पदाचा अवमान झाल्याने शिवसेना नेत्या अभिनेत्री दिपाली सैय्यद यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.” असा आशय असून कार्यवाही न झाल्यास आमदार गिरीश महाजन आणि आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी भाजपा जिल्हा महानगर महिला आघाडीच्या अध्यक्षा दीप्ती चिरमाडे, भाजपा युवा मोर्चा जळगाव महानगराध्यक्ष आनंद सपकाळे, भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, रेखा वर्मा यांच्यासह युवा मोर्चाचे सरचिटणीस मिलिंद चौधरी, भूषण भोळे, राहूल पाटील, आदी  कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/675247403761976

Protected Content