भुसावळ प्रतिनिधी । शहरातील शासकीय विश्रामगृहाजवळ दोन पोलिसांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याने खळबळ उडाली असून यामुळे खाकी डागाळली आहे.
याबाबत वृत्त असे की, शहर पोलीस स्थानकात कार्यरत असणारे संजय भूषण संजय चौधरी आणि गोपाळ रामचंद्र सोनवणे या दोन पोलीस कर्मचार्यांमध्ये दुपारी वाद झाला. यात गोपाळ सोनवणे हा दारूचा नशेत असून त्याने चौधरी यांच्यासोबत वाद घातला. याचे पर्यावसान हाणामारीत झाले. या दोन्ही कर्मचार्यांमध्ये हाणामारी सुरू झाल्याने गर्दी जमली. शेवटी काही पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांच्यातील वाद सोडविला. दरम्यान, या प्रकरणी भूषण चौधरी यांनी शहर पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून गोपाळ रामचंद्र सोनवणे यांच्या विरोधात भादंवि कलम ५०४, ५०६, ५१० आणि ३३२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, शहरात याच प्रकाराची चर्चा सुरू असून कायद्याच्या रक्षकांकडून अशी अपेक्षा नसल्याचा सूर उमटला आहे.