जळगावनंतर भुसावळ नगरपालिकेतील पापांचा भरणार घडा ? सुरेश पाटलांची एकाकी झुंज !

s l patil bhusawal

सुरेश लक्ष्मण पाटील

भुसावळ संतोष शेलोडे । जळगावच्या घरकूल गैरव्यवहारात बड्या धेंडांना गजाआड व्हावे लागल्यानंतर सर्वसामान्यांचा ‘देर है…अंधेर नही’ या उक्तीवर विश्‍वास बसला आहे. या पार्श्‍वभूमिवर, जळगावप्रमाणेच भुसावळ नगरपालिकेतील अंधाधुंद कारभाराविरूध्द एकाकी लढा देणारे सुरेश लक्ष्मण पाटील यांना न्यायाची आस लागली आहे. नेत्यांसह प्रशासनातील इमानदार अधिकार्‍यांनी त्यांना साथ दिली तर जळगावातील दादागिरीनंतर भुसावळातील भाऊगिरीलाही जोरदार दणका बसण्याची शक्यता आहे. याबाबत ‘लाईव्ह ट्रेंडस् न्यूज’चा हा एक्सक्लुझिव्ह आणि खळबळजनक रिपोर्ट.

एखाद्या नेत्याच्या हातात सत्ता असल्यास आपण सर्वशक्तीमान असल्याचा भास हा संबंधीत पुढारी आणि त्याच्या चेल्यांना होत असतो. यामुळे कोणताही सारासार विचार न करता अगदी ओकारी येईपर्यंत खाल्ले जाते. नेताही खातो आणि त्याचे समर्थकदेखील ! मात्र कधी तरी पापाचा घडा भरतोच. जळगावातील घरकूल प्रकरणातही हेच दिसून आले. मनमुराद भ्रष्टाचार करूनदेखील तपास करणार्‍या वरिष्ठ अधिकार्‍यांची जाहीररित्या टर उडवणार्‍यांना न्यायालयाने किती भयंकर दणका दिला हे आता दिसूनच आले आहे. या निकालामुळे किमान जळगाव जिल्ह्यातील तरी भ्रष्टाचार्‍यांना जोरदार हादरा बसला आहे. तर सर्वसामान्यांना आता घरकूलप्रमाणे पुढे कोण गजाआड होणार याची उत्सुकता लागली आहे. खरं तर जिल्ह्यातील अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. मात्र यातील भुसावळ येथील नगरपालिकेतल्या भ्रष्ट कारभाराविरूध्द सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश लक्ष्मण (उर्फ एस.एल.) पाटील यांनी केलेल्या तक्रारी अतिशय गंभीर असे असून यात अनेक मातब्बर लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने एस.एल. पाटील यांच्याशी साधलेल्या संवादातून त्यांनी या प्रकरणाचे कंगोरे उलगडून दाखविले.

नऊ प्रकरणांमधील घोळाचे पुरावे

सुरेश लक्ष्मण पाटील यांनी १९९९ ते २०१४ दरम्यान नगरपालिकेच्या तत्कालीन वादग्रस्त ठरावाला संमती देणारे नगरसेवक, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, कंत्राटदार आदींविरूध्द उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. त्यांनी भ्रष्टाचाराच्या विविध नऊ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यासाठी दाद मागितली आहे. यात अगदी काँप्युटर ट्रेनींग घोटाळ्यापासून ते घरकुलापर्यंतच्या प्रकरणांचा समावेश आहे. भुसावळ नगरपालिकेत बरीच वर्षे माजी आमदार संतोष चौधरी यांच्याकडे सुरेशदादा जैन यांच्याप्रमाणेच एकहाती सत्ता होती. यामुळे बर्‍याच नगरसेवकांनी विविध ठरावांवर डोळे झाकून स्वाक्षर्‍या केल्या. जळगाव घरकुलचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर भुसावळचे सह्याजीरावदेखील धास्तावले. मात्र आपले कुणी काहीच करू शकत नसल्याच्या फाजील आत्मविश्‍वासाने ते वावरू लागले. तथापि, सेवानिवृत्त नगरपालिका अधिकारी तथा सध्या ‘पेन्शनर्स असोसिएशन’चे अध्यक्ष सुरेश लक्ष्मण पाटील यांनी यातील काही गैरप्रकारांची कागदोपत्री जमवाजमव करून एक वा दोन नव्हे तर तब्बल नऊ प्रकरणांमध्ये गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तयारी करून उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यातील प्रत्येक प्रकरणात सुमारे ३० ते ३५ संशयितांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.

ईडीचीही चौकशी करण्याची मागणी

या सर्व प्रकरणांमध्ये प्रथमदर्शनच गुन्हा घडल्याचे दिसत असूनदेखीलही पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल केले नाही. तर सुरेश पाटील यांना वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला तरी न्याय न मिळाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. संबंधीत भ्रष्टाचाराचा तपास हा पोलिसांकडून काढून सीबीआयकडे द्यावा तसेच या सर्व संशयितांची सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीतर्फे चौकशी व्हावी ही मागणी सुरेश पाटील यांनी केली आहे. तथापि, यावर कार्यवाही न झाल्यामुळे त्यांनी ईडीकडून या प्रकरणी होणार्‍या टाळाटाळ करण्याबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावर पुढील सुनावणी होण्याआधी न्यायालयाने संबंधीतांना फटकार लगावत पुढील प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच एस. एल. पाटील यांच्यावर कोणताही दबाव असता कामा नये असे न्यायालयाने बजावले आहे.

ईडी झाली सक्रीय

सुरेश पाटील यांनी न्यायालयात ईडीविरूध्द संशय व्यक्त केल्यामुळे वरिष्ठ पातळीवर याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या अनुषंगाने अलीकडेच ईडीचे एक पथक भुसावळला आले होते. या पथकाने नगरपालिकेतून काही महत्वाची कागदपत्रे जप्त केली असून याचा तपास सुरू केला आहे. यातच आता घरकूलचा निकाल लागल्यामुळे यातील संशयित आजी-माजी नगरसेवकांना धडकी भरल्याचे दिसून येत आहे. सुरेश पाटील यांनी भुसावळ नगरपालिकेतील विविध प्रकरणांमध्ये ३८.०५ कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. जळगावच्या घरकूल घोटाळ्यातील संशयितांकडून व्याजासह वसुली करून दंड ठोठावण्यात आला आहे. भुसावळातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना वाचा फुटली तर या पापात भागीदार असणार्‍यांच्या वाट्याला प्रत्येकी किती दंड येईल याची खमंग चर्चादेखील भुसावळच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आमदार संजय सावकारेंची चुप्पी

संतोष चौधरी यांच्यासोबत असणारे आणि सुरेश पाटील यांनी तक्रार दाखल केलेल्यांपैकी बरेच जण आमदार संजय सावकारे यांच्यासोबत भाजपमध्ये आले आहेत. यामुळे हे प्रकरण संतोष चौधरी यांच्याविरूध्द असले तरी सावकारे यांनी चुप्पी साधली आहे. खरं तर त्यांची या प्रकरणी फार मोठी गोची होण्याची शक्यता आहे. चौधरी आणि सावकारे गटाची पडद्याआड हातमिळवणी असल्याची दबक्या आवाजात नेहमीच चर्चा होत असते. त्यांच्या मौनामुळे याला बळकटी मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. खरं तर ज्या प्रकारे जळगावातील सामाजिक कार्यकर्त्यांना एकनाथराव खडसे यांचे पाठबळ मिळाले. त्याच प्रकारे आमदार संजय सावकारे यांनीही भुसावळातील भ्रष्टाचाराविरूध्द उभे राहण्याची गरज आहे. तथापि, असे काहीही न झाल्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होत आहे.

सुरेश पाटलांचा लढा

वयोवृध्द सुरेश पाटील हे भुसावळ नगरपालिकेतील गैरव्यवहाराविरूध्द एकटे मैदानात उतरले असतांना त्यांना भयंकर दहशतीला तोंड द्यावे लागत आहे. त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून खोटे गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहेत. मात्र जळगावातील नरेंद्रअण्णा पाटील आणि उल्हास साबळे यांच्याप्रमाणे त्यांची एकाकी झुंज सुरूच आहे. मात्र घरकुलमध्ये ज्या प्रकारे कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांची साथ ज्यांना मिळाली त्या प्रकारे सुरेश पाटील यांच्या पाठीशी कुणी उभे राहिल्याचे दिसले नाही. यामुळे त्यांना आता न्यायदेवतेकडूनच अपेक्षा आहे. येथे उशीरा का होईना न्याय मिळाल्यास जळगावनंतर भुसावळातील भ्रष्टाचार्‍यांच्या पापाचा घडा भरणार असल्याची बाब उघड आहे. अर्थात, जळगावनंतर भुसावळातील भ्रष्टाचार्‍यांनाही यामुळे दणका बसणार आहे. मात्र यासाठी घटका भरण्याची वाट बघणे हाच सध्या तरी एकमेव पर्याय आहे.

पहा : भुसावळातील गैरव्यवहारांबाबत सुरेश लक्ष्मण पाटील नेमके काय म्हणतात ते !

Protected Content