Home आरोग्य यावल तालुक्यात FDA कारवाईचे स्वागत ; हॉटेल व्यवसायिकांवरही कारवाईची मागणी

यावल तालुक्यात FDA कारवाईचे स्वागत ; हॉटेल व्यवसायिकांवरही कारवाईची मागणी

0
14


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवायांचे यावल तालुक्यातून स्वागत होत असून, गुटखा, भेसळयुक्त खाद्यपदार्थ आणि बनावट दूध विक्रेत्यांवर सुरू असलेल्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र, यावल तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडूनही अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी असून, त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात अवैधरित्या गुटखा विक्री, बनावट व भेसळयुक्त दूध, खाद्यपदार्थ तसेच मुदतबाह्य औषध विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुटखा आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सुरू असलेल्या मोहिमेचे सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये प्रशासनाने घेतलेली कठोर भूमिका महत्त्वाची असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, यावल तालुक्यातील काही वडापाव विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांकडून अन्न सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. ग्राहकांना खाद्यपदार्थ देताना रसायनयुक्त पेपर रद्दीचा वापर केला जात असल्याचा आरोप करण्यात येत असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.तसेच काही हॉटेल व्यावसायिकांकडून अत्यंत खराब दर्जाचे आणि वारंवार वापरलेले तेल खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरले जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आवश्यक नियमांचे पालन केले जात आहे का, याची तपासणी अन्न व औषध प्रशासन विभागाने करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

गुटखा, बनावट दूध आणि भेसळयुक्त पदार्थांप्रमाणेच हॉटेल व खाद्यपदार्थ व्यवसायातील अनियमिततेवरही प्रशासनाने लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. आरोग्याशी संबंधित विषय असल्याने दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. यावल तालुक्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून, आता खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांमध्येही शिस्त निर्माण करण्यासाठी नियमित तपासणी मोहीम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound