साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर दिब्रिटो यांचे नाव आघाडीवर

Father Francis Dibrito

पुणे प्रतिनिधी । उस्मानाबाद येथे ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे नाव आघाडीवर आहे. आज, उस्मानाबाद येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक होणार असून दिब्रिटो यांची अध्यक्ष म्हणून निवड होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे.

कृतिशील विचारवंत आणि सुधारणावादी लेखक दिब्रिटो यांची महाराष्ट्राला ओळख आहे. गेल्यावर्षी त्यांनी वयाची 75री पूर्ण केली. पुण्यात गेल्या वर्षी झालेल्या साहित्यिक-कलावंत संमेलनाचे अध्यक्षपद दिब्रिटो यांनी भूषविले आहे. आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ, रानकवी ना.धों. महानोर, ज्येष्ठ लेखक रा.रं.बोराडे या दिग्गजांची नावे सहा महिन्यांपासून चर्चेत आहेत. चपळगावकर वगळता इतर सर्वांनी जाहीरपणे नकार कळवला आहे. ‘मुलाच्या लग्नानंतर बापाने लग्न करायचे नसते,’ या शब्दांत बोराडे यांनी नाराजी व्यक्त करून अध्यक्षपदासाठी स्पष्ट नकार दिला. या पार्श्वभूमीवर न्या. चपळगावकर यांच्याकडेच भावी अध्यक्ष म्हणून पाहिले जात आहे. लेखक, विचारवंत, मराठवाड्याचे कर्ते सुधारक अशी ओळख असलेल्या चपळगावकर यांच्या नावाला विरोध नाही; पण मराठवाड्याच्या मातीतील अनेक दिग्गजांपैकी कोणाची निवड करायची, हा पेच टाळण्यासाठी मराठवाड्याबाहेरील सर्वमान्य नाव असलेल्या दिब्रिटोंना पसंती असल्याचे वृत्त आहे. साहित्य महामंडळाच्या महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ या घटक संस्था तसेच संलग्न आणि समाविष्ट संस्थांकडून दिब्रिटो यांच्या नावावर सहमती होण्याची शक्यता आहे.

Protected Content