किरकोळ कारणावरून दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला

अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील मुंगसे गावात किरकोळ करणाच्या संशयावरून एका तरूणाला धारदार चाकूने वार करून दुखापत केली. तर घरातील साहित्य तोडून तरूणाच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे पोत तोडून नुकसान केल्याची घटना मंगळवार ६ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता घडली आहे. याप्रकरणी बुधवार ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, प्रदीप मच्छिंद्र कोळी (वय-३४) रा.मुंगसे ता. अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. प्रदीप कोळी हा गावात जागेबाबत अर्जफाटे करत असल्याच्या किरकोळ करणाच्या संशयावरून मंगळवार ६ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता गावात राहणारे भरत मोतीलाल कोळी, मोतीलाल आधार कोळी, चुनीलाल आधार कोळी, प्रवीण भाऊलाल कोळी, गोपाल प्रकाश कोळी आणि सोपान प्रकाश कोळी सर्व रा. मुंगसे ता.अमळनेर यांनी धारदार चाकू, कुऱ्हाड घेऊन त्याच्या घरात घुसले. सहाही जणांनी प्रदीप कोळी यांच्यावर चाकूने कानावर वार करून दुखापत केली तर कुऱ्हाड उलटी मारून पाय फ्रॅक्चर केला. त्यानंतर इतरांनी घरातील टीव्ही, मोबाईल आणि प्रदीप कोळी यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे पोत तोडून नुकसान करत पतीपत्नी यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

हा प्रकार घडल्यानंतर जखमी झालेले प्रदीप कोळी यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार बुधवार ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी भरत मोतीलाल कोळी, मोतीलाल आधार कोळी, चुनीलाल आधार कोळी, प्रवीण भाऊलाल कोळी, गोपाल प्रकाश कोळी आणि सोपान प्रकाश कोळी सर्व रा. मुंगसे ता.अमळनेर या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ सुनील जाधव हे करीत आहे.

Protected Content