

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव बसस्थानकाजवळ सोमवारच्या दुपारी झालेल्या दुचाकी आणि मालवाहू पिकअप वाहनाच्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पिकअप वाहनचालक स्वतःहून यावल पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किनगाव (ता. यावल) येथील आदित्य प्रमोद पाटील (वय २२, रा. किनगाव बुद्रुक) हा तरुण सोमवारी दुपारी पल्सर दुचाकी (क्र. एम.एच. १९ ई.जे. २१७०) वरून बसस्थानकाकडे जात होता. त्याचवेळी यावलहून चोपड्याकडे विद्युत खांब घेऊन जाणारे मालवाहू पिकअप वाहन (क्र. एम.एच. १९ बी.एम. ४३३२) बसस्थानकाच्या दिशेने येत होते. बसस्थानकाजवळ दोन्ही वाहनांचा जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला.
या धडकेत आदित्य पाटील गंभीर जखमी झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्याला गावातील रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, अपघातानंतर पिकअप चालकाने जबाबदारीची जाणीव ठेवत स्वयंपूर्तीने यावल पोलिस ठाण्यात उपस्थिती लावली असून, या घटनेची नोंद यावल पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.



