जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील चुंचाळे येथील आदिवासी पावरा समाज बांधवांना घरकुल योजनेअंतर्गत २ हजार स्क्वेअर फुट जागा देण्यात यावी, यासह इतर विविध मागण्यांसाठी आदिवासी पावरा समाज बांधवांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल तालुक्यातील चुंचाळे येथील ग्रामपंचायत हद्दीतील गायरान शेत गट क्रमांक ३७३ मधील आदिवासी पावरा जमात वस्तीत गेल्या ४५ वर्षांपासून रहिवास आहे. प्रत्येक कुटुंबाला २ हजार स्क्वेअर फुट जागा नावावर करून देण्यात यावी, तसेच गावातील आदिवासी पावरा समाजाच्या लोकांना आदिवासी विकास प्रकल्प योजनेअंतर्गत मिळणाऱ्या संपूर्ण लाभ देण्यात यावे, गावातील मनोज फकीरा धनगर हे त्यांचे शेतजमीन पंडित दीनदयाल अर्थसाह्य योजनेनुसार कारवाई करून क्षेत्र घरकुलसाठी देण्यास तयार झाले आहे, त्याची कार्यवाही देखील करण्यात यावी अशा या प्रलंबित मागण्यासाठी यापूर्वी यावल तहसील कार्यालयासमोर देखील आंदोलन व निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी देखील आश्वासन देण्यात आले होते परंतु अद्यापपर्यंत कुठलीही मागणी पूर्ण झालेली नाही. या अनुषंगाने यावल तालुक्यातील चुंचाळे येथील आदिवासी पावरा समाज बांधवांच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. तसेच पावरा वस्तीत पाण्याची टाकी,नळ कनेक्शन, विद्युत कनेक्शन, अंगणवाडी प्राथमिक शाळा पुरविण्यात आलेले नाही. या सुविधा देखील पुरवण्यात याव्या अशी मागणी देखील करण्यात आली आहे.