जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जादाची खते भरून ठेवू नये. असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी वैभव शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
कृषि अधिकारी वैभव शिंदे यांनी सांगितले की, “यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्हयात खत पुरवठा सुरळीत सुरु आहे. एप्रिल व मे, महिन्यात आवश्यकतेप्रमाणे खत पुरवठा कंपन्यांमार्फत करण्यात आलेला आहे. युरीया या खताचा 60 हजार 910 मेट्रीक टन साठा विक्री साठी उपलब्ध आहे. जिल्ह्यात पुरेश्या प्रमाणात सर्व खते उपलब्ध असून दरमहा खतांच्या उपलब्धतेचे नियोजन केलेले आहे.
त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की आवश्यकतेप्रमाणे खते उपलब्ध असल्याने शेतकरी बांधवांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जादाची खते भरुन ठेवू नये. तसेच खताच्या बॅगवर निर्धारीत दरापेक्षा जास्त दराने खते खरेदी करु नये. जादा दराने खत विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यस संबंधीत तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे त्वरीत तक्रार करावी. एकाच वेळी जास्त खत खरेदी करुन साठा करुन ठेवू नये, सर्व खते उपलब्ध असल्याने जसे लागेल तसेच खत उचल करावी. खत खरेदी पक्क्या बिलाने व अधिकृत दुकानातूनच करावी.
शेतकरी बांधवांनी फक्त युरीया खताचा वापर न करता इतर उपलब्ध सरळ, मिश्र व संयुक्त खतांचा वापर संतुलीत प्रमाणात करावा. जमिनीचे आरोग्य व पर्यायाने स्वत:चे आरोग्य देखील सांभाळावे व खर्चात बचत करावी.” दरम्यान, कृत्रीम खत टंचाई निर्माण करुन जादा दराने विक्री होणार नाही यासाठी म्हणुन जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकांमार्फत तपासणी सुरु आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी वैभव शिंदे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.