अखेर ‘त्या’ १४ शेतकर्‍यांना मिळाला न्याय !

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील १४ शेतकर्‍यांच्या फसवणूक प्रकरणी पोलिसांनी खाक्या दाखवताच गाड्यांपाठोपाठ आरोपी ठेकेदाराने बैलांच्या मोबदल्यात प्रत्येक शेतकर्‍याच्या नावावर ४० हजार रुपये जमा केल्याने शेतक़र्‍यांना न्याय मिळाला आहे

याबाबत वृत्त असे की, ऊस तोडीसाठी नगर जिल्हयातील भेंडा साखर कारखान्यावरील ठेकेदार बाळासाहेब ताके याने अमळनेर तालुक्यातील १४ शेतकर्‍यांचे बैलजोड्या व गाडया भाड्याने नेऊन बैलजोड्या परस्पर विकून गाड्या देखील परत केल्या नव्हत्या. एवढेच नव्हे तर उलट पक्षी शेतकर्‍यांना १२ लाख ९३ हजार रुपये घेणे असल्याच्या नोटीसा दिल्या होत्या. यामुळे ऐन दुष्काळात शेतकर्‍यांवर संकट कोसळले होते आगामी वर्षाची मशागत कशी करावी याची चिंता पडली होती. या संदर्भात शेतकर्‍यांनी माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या मार्फत पाठपुरावा करून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील याच्याकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. ताके याला अटक करून १४ गाड्या जप्त केल्या होत्या. मात्र १४ बैल जोड्या त्याने विकून टाकल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.

अखेर पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी हिसका दाखवताच ठेकेदार ताके याने आपल्या भावामार्फत प्रत्येक शेतकर्‍याच्या नावावर ४० हजार रुपये जमा केल्याने बैलांच्या ऐवजी अंशत: काही रक्कम मिळाल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे पिडीत शेतकर्‍यांनी माजी आमदार साहेबराव पाटील व पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांचे आभार मानले आहेत.

Add Comment

Protected Content