नागपूर वृत्तसंस्था । महाराष्ट्र सरकारने केलेली कर्जमाफीची घोषणा ही उधारीची घोषणा असल्याची टीका विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार असे आश्वासन दिले होते. परंतु, माफ करताना शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. आम्ही आमची सत्ता असताना सरसकट माफी दिली होती. सरकार केवळ 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचे थकित कर्ज माफ करणार असे सांगत आहे. सरकारने ही कर्जमाफी शेतकऱ्यांना नेमका कसा फायदा पोहोचविणार याचे स्पष्टीकरण द्यावे, असेही फडणवीस म्हणाले आहेत.
राष्ट्रपती शासन असताना राज्यपालांनी आठ हजार रुपये हेक्टरी पिकांकरता व १८ हजार रुपये फळबागांकरिता ही घोषणा करून पैसे दिले, तेवढेच पैसे शेतकऱ्यांना आता मिळणार आहेत. या नवीन तिघाडी सरकारने एक नवा पैसा देखील शेतकऱ्यांना दिला नाही. २५ हजारांचे आश्वासन न पाळता, शेतकऱ्यांचा विश्वासघात करण्याचे काम या सरकारने केले आहे. आज आणखी एक विश्वासघात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने केला. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते की, सरसकट कर्जमाफी व सातबारा कोरा आज मात्र या शब्दावरून ते पलटले व दोन लाखांपर्यंत कर्जमाफी करू असे सांगितले. मात्र ही कर्जमाफी देखील उधारीची आहे, असे फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले.