चाळीसगाव प्रतिनिधी । गेल्या ६ महिन्यांपासून थकीत असलेल्या रावळगाव येथील ऊस देयकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास आज दि.२१ जून पासून सुरुवात झाली आहे.
काही दिवसांपूर्वी आमदार मंगेश चव्हाण यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र आणत थकीत देयकांसाठी आर पारच्या लढाईचा इशारा दिला होता. शेतकऱ्यांनी देखील एकजूट दाखवत आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचा निश्चय केला होता. अखेर शेतकऱ्यांची एकजूट व आमदार मंगेश चव्हाण यांच्या दणक्यापुढे रावळगाव येथील एस जे शुगर कारखाना प्रशासन नमले असून आज दि.२१ जून रोजी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या खात्यात ३० ते ५० टक्के पर्यंत रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या ६ महिन्यांपासून एक रुपयाही न देणाऱ्या रावळगाव कारखाना प्रशासनाने काही प्रमाणात का होईना थकीत रक्कम देण्यास सुरुवात केल्याने चिंतेत असणाऱ्या शेतकऱ्यांना हायसे झाले आहे.
याबाबत थेट रावळगाव कारखान्याचे मालक आमदार भाई जयंत पाटील यांच्या अलिबाग येथील निवासस्थानी जाऊन शेतकऱ्यांची व्यथा मांडणारे व १५ दिवसात थकीत पेमेंट न झाल्यास आंदोलनाचा इशारा देणारे चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “उशिरा का होईना मात्र शेतकऱ्यांच्या रेट्यापुढे कारखाना प्रशासनाला नमते घ्यावे लागले व काही प्रमाणात का होईना शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत आहे याचे स्वागतच आहे, मात्र शेतकऱ्यांनी वर्षभर पोटाच्या पोराप्रमाणे जतन केलेल्या उसाचे थकीत देयके घेण्यासाठी गेल्या ६ महिन्यांपासून शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. शेतकऱ्यांनी देखील संयम पाळला व प्रसंगी सावकारी कर्ज काढून मुलांची लग्ने, खरीप पेरणी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा शेवटचा एक रुपया देखील कारखान्याने थकीत ठेवू नये अशी आमची भूमिका आहे. तसेच दोन दिवसांपुर्वी मालेगाव तहसीलदार यांनी रावळगाव कारखान्याच्या साखरेच्या गोडाऊनला सील केले तेव्हा एफआरपी प्रमाणे २३०० रुपयाहून अधिक रक्कम प्रतिटन प्रमाणे निघाली असून त्यावरील शासन नियमाप्रमाणे व्याज अशी सर्व रक्कम शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे.
शेवटच्या शेतकऱ्याचा शेवटचा रुपया निघेपर्यंत हा लढा सुरू राहील. नेमकी किती रक्कम ते आता देणार आहेत व उर्वरित रक्कम याबाबत कारखाना प्रशासनाची काय भूमिका आहे हे शेतकऱ्यांच्या सोबत जाणून घेतल्यानंतर पुढील भूमिका व आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असे देखील आमदार चव्हाण यांनी सांगितले