अमळनेर पोलीसात अकस्मात आगीची नोंद
अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील खेडी खुर्द गावातील खळ्याला आग लागल्याने दोन शेतकऱ्याचा चारा, शेतीची अवजारे जळून खाक झाले तर या आगीत म्हैस व तिचे पिल्लू भाजल्याने जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दुपारी ३ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील खेडी खुर्द गावात कैलास मधुकर पाटील वय-४५ हे वास्तव्याला आहे. त्यांचे गावातील ग्रामपंचायतीच्या हद्दीत खळे तयार करण्यात आले आहे. मंगळवारी २ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता अचानक खळ्याला आग लागली. या आगीत कैलास पाटील आणि त्यांच्या शेजारील सुभाष आत्माराम पाटील यांचा चारा, शेतीची अवजारे जळून खाक झाले आहे. या आगीत दोन्ही शेतकऱ्यांचे एकुण ३५ हजारांचे नुकसान झाले. तसेच सुभाष पाटील यांची म्हैस व तिचे पिल्लू देखील भाजले गेले. ही आग कशामुळे लागली याची माहिती समोर आलेली नाही. याप्रकरणी कैलास पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव हे करीत आहे.