अमळनेर (प्रतिनिधी)। अमळनेर पंचायत समिती येथील वरिष्ठ वेतनश्रेणीची फरकाची 4 लाख 33 हजार रुपये देण्यासाठी पैशाची मागणी करून निधी शिल्लक असतानाही वेतन देण्यास विलंब करणाऱ्या अमळनेर पंचायत समितीच्या अर्थ विभागाच्या वरिष्ठ लिपिक रमेश विसपुते यांच्याविरुद्ध एकतास येथील जि.प.शिक्षकाने गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
याबाबत माहिती अशी की, हिराला सैदांणे यांनी निवदेनात म्हटले आहे की, 10 शिक्षकांचे वरिष्ठ वेतन श्रेणीची फरक रक्कम 8 लाख रुपये अदा करण्यासाठी 24 लाख रुपये ऑनलाईन बिलसाठी आले होते. मात्र अर्थविभागाचे वरिष्ठ लिपिक रमेश सुखदेव विसपुते यांनी बिल काढण्यास टाळाटाळ केली. माझी व पत्नीची 4 लाख 33 हजार रुपये फरक रक्कम असून मला कौटुंबिक अडचण आहे. माझ्या आजीचा दवाखाना सुरू असून मी वारंवार विसपुते यांच्याकडे फरक बिल काढण्याची मागणी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊन बिल काढणे सोपे नसते काही सोपस्कार असतात असे सांगून वरचे 33 हजार रुपयांची मागणी करतात. विसपुते यांच्या विरोधात तक्रारी असून आर्थिक व्यवहार केला नाही तर ते तांत्रिक अडचण दाखवून, बिलातील कागद काढून फिरवाफिरव करतात. यापूर्वी मुक्ताईनगर येथे विसपुते यांचे याच बाबतीत निलंबन झाले होते. तरी माझी हक्काची रक्कम मिळावी अशी, मागणी हिरालाल सैंदाने या शिक्षकाने गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात केली आहे.
– प्रतिक्रिया-
संबंधित लिपीकाला नोटीस दिली असून दोन दिवसात खुलासा मागवला आहे. तसेच ऑनलाईन व ऑफलाईन आलेला निधी व शिल्लक रक्कम आदींबाबत लेखी खुलासा मागवला असून त्याबाबत पुरावा आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल.
– अजय नष्टे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, अमळनेर