अवकाळी पावसाचा चोपडा तालुक्यात पुन्हा जोरदार तडाखा; लाखोंचे नुकसान

चोपडा(प्रतिनिधी)- तालुक्यातील विटनेर वाळकी, शेंदनी, मालखेडा,चुंचाळे, चौगाव परिसराला बुधवारी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपलं. यामुळे पपई, डाळिंब, आंबा, केळीच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले.

रविवारी कमी झाले होते की काय म्हणून बुधवारी पुन्हा एकदा यावेळी फक्त वादळ वारा आणि पाऊस नाहीतर गारपिटीने सुद्धा झोडपून काढले आहे.
बुधवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास वादळी वारा, मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. हा अवकाळी पाऊस सोमवारी रात्रीपासून अधूनमधून पहाटे सातपर्यंत तालुक्यात विविध भागांमध्ये पडत होता.बुधवारी संध्याकाळी ६च्या सुमारास मोठ्या प्रमाणात गारपीट चालू झाली. यावेळी कुठे एक ते दीड मिनिटे तर कुठे पाच मिनिटपर्यंत गारपीट झाली. या गारपिटीने फळबाग, केळी, आंबा, कलिंगड, पपई, बाजरी ,मका, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.

हा पाऊस व गारपीट तालुक्यातील वढोदा , गलंगी, घोडगाव, लासुर, अनवर्दे , बुधगाव चौगाव येथे परिसराला कमी अधिक प्रमाणात आहे.
परंतु यात विटनेर, वाळकी, मालखेडा,अनवर्दे, बुधगाव , चौगाव शिवारात गारपिटीने झालेल्या नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. चौगाव येथे अनेकांच्या घर, गोठ्यावरील पत्रे उडाले असून शिवारात कडब्याच्या गंजी विस्कटल्या आहे. आंब्याच्या झाडांखाली कैर्‍यांचा सडा पडला आहे. शिवारात अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. वरील शिवारात ज्वारीच्या दाण्याच्या आकारापासून तर लिबुच्या आकाराच्या गारा पडल्या होत्या. तर पावसामुळे शिवारातील सखल भागात पाणी साचले असून शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान झाले आहे.

बुधवारी संध्याकाळी 4:45 वाजता चौगाव येथे अचानक वादळासह पाऊस व काही प्रमाणात गारांचा वर्षाव झाला .यात जि.प.शाळेशेजारील वडाच्या झाडाखाली बांधलेल्या शांताराम बळीराम पाटिल यांच्या बैलांवर वडाचे झाड कोसळून दोन्ही बैल गंभीर रित्या जखमी झाले. तसेच शांताराम परशुराम धनगर, रमेश बाबुराव कोळी ,विठ्ठल सुकदेव धनगर,लक्ष्मण चिंधू कोळी,ईत्यादिंच्या घराची पत्रे उडाली .तसेच लासुर चौगाव रस्त्यावर मोठमोठाली व्रुक्ष पडल्याने वाहतूक बंद झाली. परवा झालेल्या वादळाने सलग अठ्ठाविस तासांनी सुरळीत झालेला विज पुरवठा आजच्या वादळाने पोल पडल्याने पुन्हा खंडीत झाल्याने गावातील पिण्याच्या पाणी पुरवठ्यावर विपरीत परीणाम झाला आहे.

दुष्काळी परिस्थितीत जगविलेल्या केळीच्या बागा उध्वस्त झाल्याने शेतकर्‍यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. वाळकी येथील सरपंच मधुकर धनगर यांच्या शेतातील कापणीला आलेल्या केळीचे तीनशे ते चारशे झाडे पडल्याने लाख रुपयांचे नुकसान झाले आहे तसेच विटनेर येथील शेतकरी दिलीप गोधा कोळी यांच्या आंब्याच्या झाडावरील कैऱ्या गारपीट आणि वाऱ्यामुळे गडून पडल्या आहेत. गारपिटीने केळीची पाने फाटली आहेत. फळबांगाची पाणझडी होवून झाडांचे खराटे झाले आहेत. यात मोठ्या प्रमाणात फळगळती झाली आहे. ज्वारी, बाजरी, मका, गहू ही काढणीला आलेली पिके भुईसपाट झाले आहे.
आता फक्त एकच अपेक्षा आहे झालेल्या नुकसानीचा लवकरात लवकर पंचनामा व्हावा व भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content