रोहितचे पाय पकडण्यासाठी चाहता मैदानात घुसला

rohit sharma fan

पुणे प्रतिनिधी । पुण्यातील गहुंजे येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सध्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू असतांना एक चाहता अचानक मैदानाभोवतीचे सुरक्षाकडे भेदून मैदानात दाखल झाला आणि रोहितचे पाय धरू लागला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे रोहित बावरला. या विचित्र क्षणाचे फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत.

क्रिकेटला एखाद्या धर्माचं स्वरूप असलेल्या भारतासारख्या देशात क्रिकेटपटूंकडं देव म्हणून पाहणं हे नवीन नाही. याच क्रिकेटवेडातून मग अनेकदा विचित्र प्रकार घडतात. आज पुन्हा याचा प्रत्यय आला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी भारताने आपला डाव ६०१ धावांवर घोषित केल्यानंतर आज आफ्रिकेची फलंदाजी सुरू होती. पहिल्या कसोटी सामन्यात सलग दोन शतकं झळकावणारा भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत होता. सेन्युरन मुथुसामी बाद झाल्यानंतर भारतीय खेळाडू नव्या गड्याची वाट पाहत होते. त्याचवेळी एक चाहता अचानक मैदानाभोवतीचे सुरक्षाकडे भेदून खेळपट्टीपर्यंत आला आणि रोहितचे पाय धरू लागला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे रोहित बावरला. तो त्याला चुकवू लागला. मात्र, हट्टाला पेटलेला हा चाहता त्याचे पाय धरण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला चुकवण्याच्या प्रयत्नात रोहितचा तोल गेला आणि तोही खाली पडला. मैदानातील या विचित्र क्षणाचे फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत.

Protected Content