जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पैसे घेवून स्वॅब न घेता बनावट आरटीपीसीआर रिपोर्ट मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला होता. याप्रकरणी सुरक्षा रक्षकासह ऑपरेटर यांच्यावर रविवारी ६ फेब्रुवारी रेाजी दुपारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसारमाध्यमांमध्ये जिल्हा सामान्य रूग्णालयात बोगस आरटीपीसीआर अहवाल मिळतात याबाबत माहिती प्रसिद्ध झाली होती. त्या अनुषंगाने अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शल्यचिकित्सा विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.प्रशांत देवरे यांच्या अध्यक्षतेखाली व उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर, डॉ. संदीप पटेल यांच्या सदस्यत्वाखालील समिती नेमली होती.
या समितीने तीन दिवस सखोल चौकशी करून निष्पक्ष अहवाल तयार केला. एकूण ३८ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. अहवाल शनिवारी ५ फेब्रुवारी रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना सादर केला. त्यानुसार अहवाल वाचून अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी दोषी सुरक्षारक्षक राजेंद्र दुर्गे आणि डाटा एंट्री ऑपरेटर स्वप्नील पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांना दिले आहे.
त्यानुसार वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय गायकवाड यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी राजेंद्र विठ्ठल दुर्गे रा. जळके विटनेर ता.जि.जळगाव आणि डाटा एंट्री ऑपरेटर स्वप्निल पांडूरंग पाटील रा. जळगाव यांच्याविरोधात बनावट आरटीपीसीआर रिपोर्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहे.