फैजपूर, ता. यावल, निलेश पाटील | येथील मातब्बर ज्येष्ठ नगरसेवक हेमराज चौधरी यांनी आपल्या सौभाग्यवतींसह आज भाजपचा त्याग करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला असून याचा आगामी निवडणुकीच्या समीकरणांवर परिणाम होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत भुसावळात पार पडलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मेळाव्यात फैजपूर येथील ज्येष्ठ नगरसेवक हेमराज चौधरी आणि त्यांच्या सौभाग्यवती तथा माजी नगराध्यक्षा अमिता चौधरी यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश घेतला.
हेमराज चौधरी हे फैजपुरच्या राजकारणातील बडे प्रस्थ असून ते जिल्हा दूध संघाचे विद्यमान संचालक देखील आहेत. ऐन नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्याची बाब स्थानिक राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी असल्याचे मानले जात आहे. यामुळे भारतीय जनता पक्षाला स्थानिक पातळीवर धक्का बसणार असून राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.