नागपूर वृत्तसंस्था । गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपाची सत्ता आली. तेव्हापासून गोपालदास अग्रवाल शरीराने काँग्रेससोबत असले तरी, मनाने आमच्यासोबतच होते. त्यामुळे लोकलेखा समितीच्या प्रमुखपदी विरोधी पक्ष सदस्यापदी गोपालदास यांची नियुक्ती करताच त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे केला.
गोंदियातील काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी अखेर सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व गोंदियाचे पालकमंत्री परिणय फुके यावेळी उपस्थित होते. लोकलेखा समितीच्या प्रमुखपदी विरोधी पक्ष सदस्याची नियुक्ती करण्यात येते. गोपालदास अग्रवाल यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांनी अधिकाधिक बैठका घेऊन सर्वाधिक अहवाल सादर केले. यातील बरीच माहिती स्फोटक आहे. आघाडीच्या काळातील भ्रष्टाचार सभागृहात मांडून त्यांनी नेत्यांचे गैरव्यवहार चव्हाट्यावर आणले, असेही मुख्यमंत्री म्हणाले. गोंदियाची जागा आम्ही कधीही जिंकलो नाही. अग्रवाल व त्यांच्या समर्थकांच्या पक्षप्रवेशाने पहिल्यांदाच या जागेवर विजय मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.