जळगाव प्रतिनिधी । देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनीच आपले तिकिट कापल्याचा गौप्यस्फोट माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी त्यांनी थेट या दोघांची नावे घेतल्याने हे प्रकरण पुन्हा तापणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एकनाथराव खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर थेट आरोप केले आहेत. या मुलाखतीत खडसे म्हणाले की, ममला तिकीट मिळू नये म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांनी कोअर कमिटीच्या बैठकीत नकारात्मक अहवाल दिला. या कमिटीतील माझ्या जवळच्या मित्रांनीच मला ही माहिती दिली. दरम्यान, पक्षाचे कार्याध्यक्ष पी. नड्डा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मी त्यांना ही सर्व माहिती दिली आहे. त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले तरी माझे समाधान झालेले नाही. तथापि, आपण भाजप सोडणार नसल्याचे नाथाभाऊंनी स्पष्ट केले.
खडसे पुढे म्हणाले की, आजपर्यंत मी प्रामाणिकपणे काम केलं आहे. त्यामुळे मला घाबरण्याचे कारण नाही. मी माघार घेणार्यातला माणूस नाही. जे सत्य आहे ते मांडलं पाहिजे. या विचारांचा मी आहेे. गेल्या चाळीस वर्षांपासून मी राजकारणात आहे. त्यामुळे मतदारसंघातील कामांसाठी मी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. हे मी ठासून सांगितले.पुढेही मला भेट घ्यावी लागली तर ती घेईन, असेही खडसे म्हणाले. दरम्यान, आजवर नाथाभाऊंनी सूचकपणे पक्षांतर्गत विरोधकांकडे अंगुलीनिर्देश केला असला तरी पहिल्यांदाच त्यांनी दोन्ही नेत्यांची नावे घेतल्याने खळबळ उडाली आहे.