मुक्ताईनगर प्रतिनिधी | येथील प्रभाग क्रमांक-१३ मध्ये सुविधांचा ठणठणाट असून नागरिकांनी अनेकदा संताप व्यक्त करून देखील गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला जाग येत नसल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी आता मनसेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
याबाबत वृत्त असे की, मुक्ताईनगर शहरातील प्रभाग क्रमांक-१३ हा नगरपंचायत हद्दीत येतो की नाही ? हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे. कारण या भागातील लोक हे मुक्ताईनगर शहराचे नव्हे तर एखाद्या खेड्याचे रहिवासी असल्याचा अनुभव त्यांना येत असल्याचे याआधीदेखील अधोरेखीत झाले आहे.
मुक्ताईनगर मधील प्रभाग क्रमांक १३ मध्ये निवृत्ती नगर पुनर्वसन टप्पा ३ हा भाग होतो. या परिसरात गटारी नसून घाण पाणी हे रस्त्यावरूनच वाहतांना दिसून येते. परिणामी डेंग्यू मलेरिया,सदृश्य तापाच्या साथीने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होतांना दिसुन आला आहे. आधीच रस्ते नाहीत, आणि गटारी देखील नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे प्रशासनाने तात्काळ युद्ध पातळीवर पाण्याचे नियोजन करून रस्त्यावर मुरुम्म टाकून गैरसोय तत्काळ दूर करावी अशी मागणी करण्यात आली असली तरी याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
प्रभागातील नागरिकांना कोणत्या फार मोठ्या सुविधा नको आहेत. त्यांना अगदी साधारण पायाभूत सुविधांची गरज असली तरी याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. सर्व प्रकारचे कर भरून सुद्धा योग्य सोय होत नसल्याने नागरिक संतप्त आहेत. यातच प्रसारमाध्यमांमधून याबाबत वृत्त आले. लाईव्ह ट्रेंडस न्यूजने याबाबतचा व्हिडीओ वृत्तां देखील प्रसिध्द केला. मात्र पाहू-करू असे करून कामांची टाळाटाळ केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात आता मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाचे तालुकाध्यक्ष (जनहित ) मधुकर रतनलाल भोई यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून या प्रभागातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.