जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या इकेवायसीसाठी ३१ मे पर्यंत मुदत होती. यात ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत २०१९ पासून जिल्ह्यातील अल्पभूधारक, अल्पउत्पन्न असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी दोन हजार रुपयेप्रमाणे ३ समान हप्त्यात दरवर्षी ६ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात लाभ दिला जात आहे. आतापर्यत जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना १० हप्त्यांचा तर काही शेतकऱ्यांना कमी अधिक प्रमाणात लाभ मिळालेला आहे. पीएम किसान पात्र लाभार्थ्यांना लाभ सहजरित्या अदा करता यावा म्हणून केंद्र शासनाने योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांची ओळख पडताळणी (ई-केवायसी) पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने ३१ जुलै २०२२ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.
यापूर्वी ३१ मार्च पर्यंत मुदत होती. मार्च अखेर प्रशासनस्तरावर तसेच शासनमान्यता सुविधा केंद्रांवर सर्वरसाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता त्यात ३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. अजूनही बऱ्याच लाभार्थी शेतकऱ्यांना पोर्टलवरील येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता आता ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पात्र लाभार्थ्यांसाठी स्वतः https://pmkisan.gov.in/ मोबाईलवर या लिंक आधारे किंवा नजीकच्या सामाईक सुविधा केंद्रामार्फत ई-केवायसी पडताळणी करण्याच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
पीएम किसान लाभार्थ्याने स्वत:च्या सोईनुसार मोबाईल अथवा सामाईक सुविधा केंद्रामार्फत या दोन्हीपैकी एका सुविधेच्या आधारे लाभार्थ्यास त्याच्या आधार क्रमांकाशी संलग्न केलेल्या मोबाईलवर येणाऱ्या ओटीपीच्या आधारे स्वत:ची ई-केवायसी पडताळणी करता येईल. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यासाठी सामाईक सुविधा केंद्राकडून रक्कम १५ रुपये प्रती लाभार्थी शुल्क आकारण्यात येईल.
उर्वरीत लाभार्थ्यांनी स्वत: अथवा सामाईक सुविधा केंद्रच्या माध्यमातून त्यांची ई-केवायसी पडताळणी केंद्र शासनाने दिलेल्या ३१ जुलै २०२२ च्या मुदतीपूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन उपआयुक्त (कृषि गणना) तथा पथक प्रमुख, पी.एम.किसान तसेच जिल्हा प्रशासनाने केले आहे.