जळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या वर्तणुकीविरोधात राज्यातील ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन (व्हिडीओ)

753c628f 463c 44bc a883 980e1bddb4f3

जळगाव (प्रतिनिधी) येथील जिल्हाधिकाऱ्यांनी यावल तालुक्यातील चिखली येथील ग्रामसेवकास पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे काम करण्यासाठी अर्वाच्य भाषेत धमकावल्याचा आरोप करीत राज्य ग्रामसेवक संघटनेने राज्यभर काम बंद आंदोलन पुकारले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे काम प्रशासकीय स्तरावर त्रीसदस्यीय समितीव्दारे कामकाज सुरु आहे. राज्याच्या मुख्य सचिवांच्या दि.४ फेब्रुवारी २०१९ च्या शासन निर्णयानुसार ग्रामस्तरावरील तलाठी हे मुख्य सचिव असून पुढील सर्व उर्वरीत कृषी सहाय्यक, गटसचिव, ग्रामसेवक यांना सदस्य म्हणून हे कामकाज करावयाचे आहे. त्यानुसार योजने साठी पात्र शेतकऱ्यांचे मूळ दस्त नोंदी ७/१२ उतारे हे सर्व तलाठी यांचेकडेच असल्याने ग्रामसेवकांनी यापूर्वीच सहकार्याची भुमीका राज्य संघटनेने घेतलेली आहे ग्रामसेवकांची स्वतंत्ररित्या पालक अधिकारी म्हणून नेमणूक न करण्यासंदर्भात राज्य शासनाला व जिल्हास्तरीय अधिकारी यांना यापूर्वीच कळविलेले आहे. शासन निर्णयातील तरतूदीशी विसंगत आदेश देण्याची भुमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांनी आज (दि.२६) सकाळी १०-३५ मिनिटांनी ग्रामसेवक पी.व्ही. तळेले यांना त्यांचे मुख्यालय चिखली असतांना पाडळसा ता. यावल येथील काम करण्याची सक्ती करीत अर्वाच्य शिवीगाळ करून धमकी दिल्याने ग्रामसेवक तळेले यांना उच्च रक्तदाबाने छातीत दुखु लागले, त्यांना भालोद प्रा.आ.केंद्रात प्राथमिक उपचारानंतर तेथे पुरेशी सुविधा नसल्याने भुसावळ येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. यापूर्वी फैजपूर उपविभागिय अधिकारी यांनी अशाच दबावतंत्राचा वापर करत महिला कर्मचारी यांनाही व्हिडीओ कॉल करणे, कारण नसतांना गावांना अपवेळी भेटी देवून कर्मचाऱ्यांना तणावाखाली ठेवणे, असे प्रकार वारंवार केलेले आहेत.

झालेल्या प्रकारामुळे जिल्हा ग्रामसेवक संघटनेने यानंतर पंतप्रधान किसान योजनेचे संपूर्ण काम बंद करण्याचा निर्णय घेतला असून या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहेत. संपूर्ण राज्यातील ग्रामसेवकांनी राज्यभर काम बंद आंदोलन सुरु केले आहे. याबाबत राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. जळगांव यांची प्रत्यक्षात भेट घेवून जिल्हा ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष नंदकुमार गोराडे, सरचिटणीस संजय भारंबे, जि.प. कर्मचारी महासंघाचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत आर. तायडे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक खैरनार, मानद सचिव गौतम वाडे, जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रशेखर सोनवणे, जिल्हा सहसचिव कैलास पाटील, कायदेशीर सल्लागार रमेश पवार व सर्व जिल्हा संघटक यासह जिल्हाभरातील सर्व तालुका अध्यक्ष/सचिव यांनी आपली कैफियत मांडून निवेदन सादर केले आहे. ग्रामसेवकास दिलेल्या गलीच्छ वागणुकीच्या निषेधार्थ जि.प. कर्मचारी महासंघानेही आंदोलनास पाठींबा दिला आहे. यावर योग्यती न्यायीक भुमिका न घेतल्यास जि.प.तील सर्व प्रवर्ग संघटना सहभागी होवून आंदोलनाची व्याप्ती वाढविली जाईल, असे पांठीबा पत्रक महासंघाचे सरचिटणीस प्रशांत आर. तायडे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

 

Protected Content