अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर येथे २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होत असलेल्या ग्रंथ प्रदर्शन नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वितरक, प्रकाशकांच्या मागणीनुसार नोंदणीसाठी २८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून ३० जानेवारी रोजी सोडत काढण्यात येणार आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे, वाचक, साहित्यिक आणि ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांच्या आनंदाचा वार्षिक सोहळा. संमेलनादरम्यान, ग्रंथ, पुस्तके, साहित्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. यासाठी संमेलनस्थळी ग्रंथ दालनासाठी प्रकाशक, ग्रंथ वितरक यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ग्रंथ दालन मागणीचा अर्ज. अटी व शर्ती याबाबतची सविस्तर माहिती संमेलनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच म.वा.मंडळ, अमळनेर कार्यालयातही ग्रंथदालन नोंदणी करता येवू शकते. नोंदणीसाठी २८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून अधिक माहितीसाठी श्यामकांत भदाणे ९४२३९०३०४४ यांच्याशी संपर्क साधावा.
संमेलन सर्व वाचक, साहित्यिक व नागरिकांसाठी खुले आहे. यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. मात्र ज्यांना निवास व भोजनाची व्यवस्था हवी असल्यास त्यांनी चार हजार रुपये भरुन प्रतिनिधी म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे. ही व्यवस्था २, ३ व ४ फेब्रुवारी दरम्यान असेल. अधिक माहितीसाठी प्रा.डॉ.पी.बी.भराटे ९४२३९३४७९७ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.