गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे महाशिबिर संपन्न

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “येणारा काळ स्पर्धेचा काळ असणार आहे, या काळासाठी स्वतःच्या क्षमतांचा विकास करा स्पर्धेला सामोरे जा” असे प्रतिपादन नागपूर महानगर विकास प्राधिकरणाचे उपसंचालक स्पर्धा परीक्षांचे प्रसिद्ध लेखक कपिल पवार यांनी केले. भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन संचलित गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिकेतर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा महाशिबिरात ते बोलत होते.

याप्रसंगी मंचावर गौराई कृषी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. डी.आर.चौधरी, वाकोद येथील पोलीस पाटील संतोष मुठे, स्पर्धा परीक्षा तज्ञ जयदीप पाटील, बन्सीलाल हस्तीमल जैन महाविद्यालयाच्या प्राचार्या रूपाली वाघ, विनोदसिंग राजपूत ,राणीदानजी जैन विद्यालयाचे प्राचार्य आर.सी.चौधरी मंचावर उपस्थित होते.

याप्रसंगी पुढे बोलताना श्री पवार म्हणाले की, “वाकोद येथे उभारलेली अभ्यासिका आणि ग्रंथालय हे तरुणांचे भविष्य निर्माण करणारे देवालय आहेत. अशोकभाऊ जैन यांनी दूरदृष्टी राखून या केंद्राचे निर्माण केले आहे.यातून भविष्यात अनेक अधिकारी निर्माण होतील.अधिकारी म्हणून करिअर घडवितांना स्पर्धा परीक्षांना सामोरे जा. सर्व विषयांचा सखोल अभ्यास करा. दररोज वृत्तपत्र वाचन करा.स्वतःच्या अभ्यासाचे परिपूर्ण नियोजन करून ते अमलात आणण्यासाठी सर्वस्व झोकुन द्या. वाकोद येथील माती सक्षम नेतृत्व निर्माण करणारी माती आहे.स्पर्धा परीक्षांचे क्षेत्र आव्हानाचे असले तरी अवघड अजिबात नाही. उत्तम नियोजन, योग्य मार्गदर्शन आणि मेहनत या त्रिसूत्रीच्या बळावर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविता येते असेही ते म्हणाले.

याप्रसंगी स्पर्धा परीक्षा तज्ञ, संपूर्ण विज्ञान पुस्तकाचे लेखक जयदीप पाटील यांनीही मार्गदर्शन केले ते म्हणाले की, “ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असतात. याची जाणीव झाल्यास खेड्यातील विद्यार्थी जीवनात हवे ते यश मिळवू शकतो.गौराई स्पर्धा परीक्षा केंद्र हे वाकोद पंचक्रोशीसाठी वरदान ठरणार आहे असेही ते म्हणाले. याप्रसंगी वाकोद येथे स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणाऱ्या श्री नितीन पाटील व गणेश पवार यांचा सन्मान करण्यात आला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी. आर. चौधरी,सौ रूपाली वाघ यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार व अर्चना चौधरी यांनी मानले. याप्रसंगी शिक्षक,ग्रामस्थ व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content