एक आठवड्याने वाढवा अधिवेशन ! : मुनगंटीवार

मुंबई प्रतिनिधी | राज्यातील अनेक महत्वाचे प्रश्‍न प्रलंबीत असल्याने अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्यांनी वाढविण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, कमीत कमी एक आठवडा कालावधी वाढवला पाहिजे. कारण आमच्याकडे भरपूर कामकाज आहे. या सभागृहाला योग्य आणि समर्पक न्याय द्यायचा असेल तर एक आठवडा हे अधिवेशन वाढवलंच पाहिजे. याप्रसंगी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर ते म्हणाले की, आज त्यांनी त्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आम्ही विरोधी पक्ष बसणार आहोत. त्यावर आमचा पुढील निर्णय घेणार आहोत.

मुनगंटीवार पुढे म्हणाले की, राज्याचं अर्थचक्र थांबलं आहे. अर्थचक्र कोमात गेलं आहे. आज राज्यात अनेक रोजंदारी कामगारांचे प्रश्न आहेत. धानाचा बोनस दिला नाही. शेतकर्‍यांचे प्रश्न आहेत. कोरोनाच्या कालावधीत झालेला भ्रष्टाचार आहे. आरोग्य सेवेचं अपग्रेडेशन झालं नाही. मंत्रालया भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडत आहेत, असे अनेक विषय आहेत. पेपरफुटीसारखे घाणेरडे पाप या राज्यात होत आहे. त्यामुळे जनतेच्या मनात आक्रोश आणि रोष आहे. त्यामुळे हे लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील. नाही तर नाही वाढवणार. सरकार कुंभकर्णाच्या झोपेत असेल तर गैर आहे. निर्बंध लादलेच पाहिजेत. पण त्याआधी उपाययोजनाही केल्या पाहिजे असे आ. मुनगंटीवार यांनी सुचविले.

Protected Content