मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम नव्याने जाहिर होणार

जळगाव प्रतिनिधी । राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक 5 फेब्रुवारी, 2020 रोजीच्या आदेशान्वये तयार करण्यात आलेली मतदार यादी व निवडणुक कार्यक्रम रद्द करण्यात आला असून या मतदार यादी व ग्रामपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम नव्याने जाहीर करण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांनी कळविले आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार माहे एप्रिल 2020 ते जून, 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील मस्कावद खुर्द व मस्कावदसिम या दोन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी दिनांक 24 फेब्रुवारी, 2020 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती. त्यानुसा या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक 29 मार्च, 2020 रोजी मतदान होणार होते. तथापि, राज्य निवडणुक आयोगाकडील दिनांक 17 मार्च, 2020 रोजीच्या पत्रान्वये राज्यात कोरोना विषाणु (कोविड -19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे कामकाज (प्रभाग रचना, मतदार यादी व प्रत्यक्ष निवडणुक) ज्या टप्प्यावर असतील त्याच टप्प्यावर पुढील आदेश होईपर्यत स्थगित करण्यात आले होते.

राज्य निवडणुक आयोगाने 19 नोव्हेंबर, 2020 रोजीच्या आदेशान्वये माहे एप्रिल 2020 ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादी ही दिनांक 1 जानेवारी, 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत असल्याने व सध्या दिं. 1 जानेवारी, 2020 या अर्हता दिनांकावर आधारित अद्यावत मतदार यादी उपलब्ध असल्याने या सर्व नवीन मतदारांचा समावेश होणे न्यायिक असल्याचे म्हटले आहे. दिनांक 5 फेब्रुवारी, 2020 रोजीच्या आदेशान्वये तयार करण्यात आलेली मतदार यादी व निवडणुक कार्यक्रम रद्द करण्यात येत असून या ग्रामपंचायतींच्या मतदार यादी व निवडणुक कार्यक्रम नव्याने जाहीर करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. असे रविंद्र भारदे, उपजिल्हाधिकारी (महसुल) जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content