जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मेहरूण शिवारातील शेतातून अज्ञात चोरट्याने सौरपंपासह कनेक्टरची १२ हजार रुपयांची केबल लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, आनंदा रघुनाथ पाटील (४३, रा. रामेश्वर कॉलनी) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. जैन इंरिगेशन कंपनीत खासगी नोकरी करून असून त्यांची मेहरूण शिवारात शेत गट क्रमाक ५० मध्ये शेत आहे. त्यांच्या शेतात मुख्यमंत्री सौर कृषी पंप लावण्यात आलेला आहे. ४ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर दरम्यान आनंदा पाटील हे दिवाळी निमित्त गावाला गेले होते. दरम्यान त्यांच्या मालकीच्या शेतातून अज्ञात चोरट्याने सौरपंपासह कनेक्टरची १२ हजार रुपयांची केबल चोरून नेल्याचे मंगळवारी २१ नोव्हेंबर सकाळी १० वाजता उघडकीला आले आहे. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर आनंदा पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहेत.