मुक्ताईनगरात एका खासगी प्रसूती रुग्णालयात चक्क मुदत संपलेली औषधे; तक्रारच गुलदस्त्यात

मुक्ताईनगर प्रतिनिधी । शहरातील एका खासगी प्रसूती रुग्णालयात प्रसूत झालेल्या विवाहितेला चक्क एक्सपायरी डेट अर्थातच मुदत संपलेली औषधे दिल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याची चर्चा मंगळवारी सकाळी संपूर्ण तालुक्यात पसरली आहे. सन २०१७ ला संबधित औषधाची मुदत संपलेली होती. या संदर्भात तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्याकडे देखील भ्रमणध्वनीवरून तक्रार करण्यात आलेली होती, मात्र तीही गुलदस्त्यातच राहिली असून घटनास्थळी प्रचंड गर्दी झालेली होती.

या प्रकारामुळे आता शहरात अनेक ठिकाणी होणारा मुदत संपलेल्या औषधींचा वापर यावर आळा बसेल अशी आशावादी चर्चा होत आहे. मात्र या चर्चांना दुपारीच फूलस्टॉप लागला कारण सदर महिलेच्या नातेवाईकांनीच आमची काही तक्रार नाही अशी भूमिका घेतली व त्या खासगी प्रसुती रुग्णालयाने देखील तो प्रकार आमचा नव्हेच म्हणत हात झटकले. परिणामी इतकी मोठी बाब आपआपसात कशी मिटली याबाबत तर्क वितर्क सुरू आहे.

शहरात मोठं मोठी आलिशान हॉस्पिटल्स थाटण्यात आलेली असून सर्वसामान्य रुग्णांना परवडणार नाही अशी महागडी औषधी देऊन उपचार केली जातात. तर प्रसूती रुग्णालयांचे बिल आकारणी पाहिली असता ३० ते ५० हजार रुपयांपर्यंत सिझेरियन चा खर्च असतो. उपचारार्थींकडून इतकी मोठी रक्कम उकळली जात असताना संबंधीतांकडून एक्सपायरी डेट औषधी देऊन रुग्णांची फसगत करण्यामागचा उद्देश काय ? त्यातच एक्सपायरी औषधी ने रुग्णांच्या जीवितास अपाय झाल्यास कोण जबाबदार असेल ? आरोग्य प्रशासनाने खासगी वैद्यकीय सेवा देणार्‍या डॉक्टर व मेडिकल यांच्याकडील औषधी साठयांची वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे आहे अशी चर्चा आहे .

नेमका उफाळलेला संताप अचानक ; गुलदस्त्यात जाण्यामागचे कारण काय ?
संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकाला एक्सपायरी डेट औषधी दिल्याचा संबंधितांनीच व्हिडीओ पुरावा असल्याचा दावा करून प्रसूती रुग्णालयात घातलेला गोंधळ व प्रसूती रुग्णालयाचे डॉक्टर यांनी देखील मेडिकल वरून चुकीची औषधी दिली गेल्याची पत्रकारांना कबुली अशा घटनाक्रमानंतर दुपारी चक्क असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा व फसगत घालणार्‍या रुग्ण व नातेवाईकांची तक्रार नसल्याची स्पष्टोक्ती यामुळे नेमकी शाळा कशाची भरली ? किंवा त्या कुटुंबाला धमकी तर दिली गेली नसावी, अशी चर्चा सुरु आहे.

Protected Content