मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार गजानन किर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी केली. यासंदर्भात शिशिर शिंदे यांनी शिवसेना पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. पक्ष विरोधी वक्तव्य केल्यानं त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करावी. त्यांना निरोपाचा नारळ द्यावा अशी मागणी शिशिर शिंदे यांनी पत्रातून केली आहे.
शिशिर शिंदे यांनी त्यांच्या पत्रात म्हटलंय की, लोकसभा निवडणुकीत राज्यातील पाचव्या टप्यातील मतदानाच्या दिवशी शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानन किर्तीकर यांनी आणि त्यांच्या पत्नी यांनी पक्ष विरोधी वक्तव्यं केली. दोघांनीही विरोधी पक्ष ठाकरे गटाचे बाजू घेतली. त्यामुळे मातोश्रीचे “लाचार श्री” होणाऱ्यांना पक्षातून त्वरीत बाहेरचा रस्ता दाखवावा अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी शिवसेना पक्षाचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
गजानन किर्तीकर यांचे चिरंजीव अमोल किर्तीकर यांना ठाकरे गटाने उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यांनतर अमोल किर्तीकर हे गजानन किर्तीकर यांच्याच कार्यालयातून कारभार करत होते. तसेच गजानन किर्तीकर शिवसेनेत असतानाही त्यांचा खासदार निधी अमोल किर्तीकर यांनी स्वत: च्या प्रचारासाठी विकासकामांसाठी वापरला. त्यामुळे त्याचा शिवसेना पक्षाला शून्य लाभ झाला. मात्र फायदा ठाकरे गटाला झाला असा आरोपही शिशिर शिंदे यांनी केलाय.
मतदानाच्या दिवशी गजानन किर्तीकर यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत ठाकरे गटाची बाजू घेतली होती. गजानन किर्तीकर यांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झालेली आहे. गजानन किर्तीकर यांचे हे उद्योग पक्षाला बदनाम करत आहेत. त्यामुळे आता गजानन किर्तीकर यांची पक्षातून त्वरीत हकालपट्टी करावी आणि त्यांना निरोपाचा नारळ द्यावा अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी शिवसेना मुख्यनेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे.