विहिरीत अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ; ओळख पटविण्याचे आवाहन

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कजगाव-भडगाव मार्गालगत असलेल्या कजगाव शिवारातील विहिरीत एका अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर मृतदेह वसंत श्रीधर अमृते यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला.

शेतकरी वसंत अमृते यांनी विहिरीत मृतदेह दिसल्यानंतर तातडीने कजगावचे पोलीस पाटील राहुल पाटील यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी भडगाव पोलीस स्टेशनला घटनेची कल्पना दिली. घटना समजताच पीएसआय सुशील सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकात कजगाव बीटचे पोलीस नाईक नरेंद्र विसपुते व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. प्राथमिक तपासात मृत तरुणीचे अंदाजे वय २५ वर्षे असल्याचे समोर आले आहे. तिच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर मागील बाजूस इंग्रजीत ‘पी’ असे गोंदलेले आहे. ही माहिती तिची ओळख पटवण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.

भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तरुणीच्या मृत्यूचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. हा अपघात आहे की आत्महत्या, की घातपाताचा प्रकार आहे, याबाबत पोलीस विविध अंगाने तपास करत आहेत.

Protected Content