खळबळजनक : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात कोट्यावधीचा अपहार; सात जणांविरुद्ध गुन्हा

yaval adivasi prakalp office

यावल (प्रतिनिधी)  एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभागा अंतर्गत लाभार्थांसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांमध्ये अपहार केल्याप्रकरणी आदिवासी प्रकल्प विभागाच्या सात अधिकाऱ्यांविरुद्ध आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे प्रचंड खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्यांनी फक्त कागदोपत्री लाभार्थ्यांना वस्तू वाटप केल्याचे दाखवत करोडो रुपये हडप केले आहेत.

 

या संदर्भात अधिक असे की, आदिवासी प्रकल्प विभागाअंतर्गत आदिवासी बांधवांसाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनांमध्ये गरजूंना वस्तू स्वरुपात मदत केली जाते. परंतु २००५-१० या पाच वर्षात लाभार्थींना वस्तू वाटल्याचे भासवून शासनाची तब्बल १ कोटी २० लाख ४ हजार ८४५ रुपयांची फसवून करण्यात आलेली आहे. या संदर्भात आदिवासी प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार भानुदास हिवाळे यांनी यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सन २००५-०६ या वर्षात लाभार्थ्यांना २० मंगळसूत्र व भांड्यांचा संच वाटप दाखवून २ लाखांची, सन २००५-०६ या वर्षात २५७ मंगळसूत्र व भांड्यांचा संच वाटप दाखवून २५ लाखांची तर सन २००८-१० या वर्षात दुधाळ जनावरे पुरवठा केल्याची कागदोपत्री दाखवून ६१ लाख ६८ हजार२४० रुपयांचा अपहार करण्यात आला. त्याचपद्धतीने मंगळसूत्र व भांड्यांचा संच वाटपात ३ लाख,सन २००८-१० या वर्षात पीव्हीसी पाईप खरेदीत ३ लाख ३२ हजार ६०५ रुपयांचा तर सन २००६-०७ दुधाळ जनावरे पुरवठा करण्यात २५ लाकः ४ हजाराचा अपहार केल्याचे म्हटले आहे.

 

याप्रकरणी आदिवासी प्रकल्प विभागाचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी तारासिंग बी पाडावी, व्हेंडर सुधाकर धामणे, तत्कालीन प्रकल्प अधिकारी जी.एन.वळवी, तत्कालीन प्रकल्प अधिकारी श्री.उमाळे, तत्कालीन प्रकल्प अधिकारी ए.एम.निकुंभे, तत्कालीन प्रकल्प अधिकारी श्री.थोरात, तत्कालीन प्रकल्प अधिकारी गुलाब वळवी यांच्या विरुद्ध शासनाची फसवणूक केली म्हणून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सरिता कोळपकर या करीत आहे. दरम्यान, या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

Add Comment

Protected Content