पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या अनेक महिन्यांपासून आपली भूमिका उघड न करणारे माजी आमदार दिलीप ओंकार वाघ हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असून ते लवकरच समर्थकांसह पक्षात प्रवेश करणार आहेत. यामुळे पाचोरा-भडगावच्या राजकारणाला नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीत अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. यात दोन माजी मंत्र्यांसह पाच माजी आमदार हे अजितदादा पवार गटात दाखल झाले. तथापि, यात पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांचा समावेश नव्हता. यातच ते कोणत्याही गटाच्या व्यासपीठावर जात नसल्याने त्यांची आगामी वाटचाल ही नेमकी कशी असेल ? याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्मित झाले होते. आता अखेर हा सस्पेन्स संपला असून वाघ हे आपल्या सहकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे निश्चीत झाले आहे.
दिलीप वाघ यांना मोठा राजकीय वारसा आहे. त्यांचे वडील ओंकारआप्पा वाघ हे १९६७ ते १९९९ असे तब्बल तीन दशके आलटून-पालटून पाचोऱ्यातुन आमदार म्हणून निवडून आले होते. समाजवादी विचारांचे कट्टर समर्थक असलेल्या ओंकारआप्पांनी निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतांना शरद पवार यांची साथ धरली. यानंतर गेल्या पाव शतकापासून त्यांचे पुत्र दिलीप वाघ हे शरद पवार यांचे समर्थक म्हणून वाटचाल करत आहेत. तथापि, आता पवारांची साथ सोडून त्ो भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.
दिलीप वाघ यांना मानणारा मोठा वर्ग पाचोरा-भडगाव मतदारसंघात आहे. तसेच त्यांच्या कुटुंबाकडे पीटीसी सारखी मोठी संस्था देखील आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार आदींमध्ये देखील वाघ यांचे समर्थक आहेत. यातच आता त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षामध्ये आधीच अमोल शिंदे यांच्यासारखा मातब्बर नेता भाजपकडे असतांना आता दिलीप वाघ यांची देखील या पक्षात एंट्री होत आहे. आगामी काळात हे दोन्ही नेते एकमेकांशी कसे जुडवून घेतील ? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तर, दुसरीकडे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या वर्चस्वाला आव्हान देत भाजपला पुढे घेऊन जाण्याचे कठीण आव्हान देखील दिलीप वाघ यांच्या समोर आहे.
सध्या महायुती सत्तेत असल्यामुळे आमदार किशोर पाटील व दिलीप वाघ यांच्यात टोकाचे वाद होतील ही शक्यता धुसर आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र दोन्ही नेतृत्वाचा कस लागणार हे निश्चीत मानले जात आहे. एकंदरीत पाहता दिलीप वाघ यांची भाजपमधील ‘एंट्री’ ही स्थानिक राजकारणावर मोठे परिणाम घडवणारी राहणार आहे.