पुणे- वृत्तसेवा | विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या काळात मतदान यंत्र म्हणजेच इव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आली असून यासाठी मला दहा लाख रूपये देण्यात आल्याचा सनसनाटी आरोप वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
रणजीत कासले यांना आज सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याआधी पुणे विमानतळावर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी अनेक धक्कादायक आरोप केले. यात वाल्मीक कराड याचा एन्काऊंटर करण्यासाठी धनंजय मुंडे यांची ऑफर असल्याच्या आरोपाचा त्यांनी पुनरूच्चार केला. तर यासोबत, त्यांनी एक नवीन आरोप करून खळबळ उडवून दिली.
या संदर्भात कासले म्हणाले की, निवडणुकीच्या दिवशी, 21 नोव्हेंबर रोजी संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावाने माझ्या अकाऊंटवर 10 लाख रुपये आले. त्यानंतर परळीमध्ये ईव्हीएम ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी माझी ड्युटी होती. ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात येणार आहे, त्यामुळे तुम्ही यापासून दूर राहा असं वाल्मिक कराडने आपल्याला सांगितलं.