महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता आली पाहिजे – राज्यपाल कोश्यारी

bhagat singh koshyari 1567320794

मुंबई वृत्तसंस्था । मराठी आणि उत्तराखंडातील पहाडी भाषा या दोन भाषांमध्ये बरेचसे साधर्म्य आहे. मराठी बोलणे फारसे अवघड नाही. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा बोलता आली पाहिजे, महाराष्ट्रात राहता तर मराठी भाषा शिका,’ असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईत केले.

‘उत्तराखंड भवन’चे लोकार्पण
वाशी येथे उभारण्यात आलेल्या ‘उत्तराखंड भवन’चे लोकार्पण राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत, उत्तराखंड राज्याच्या आदिवासी मंत्री रेखा त्यागी, महापौर जयवंत सुतार, आमदार गणेश नाईक, म्हात्रे आदींसह उत्तराखंड राज्याचे मूळ रहिवासी असलेले परंतु मुंबईमध्ये कार्यरत असलेले अधिकारी, चित्रपट कलावंत यांसह नागरिक उपस्थित होते.

उत्तराखंड राज्याप्रमाणे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव वाढविण्यासाठी राज्य सरकारशी चर्चा करणार असल्याचे सांगून कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील देश प्रगती करत असल्याचे सांगितले. पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून गाव तेथे रस्ता झाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करीत आहेत. आज रस्त्यांचे संपूर्ण देशात जाळे तयार झाले असून सगळी राज्ये एकमेकांशी जोडली गेली आहेत. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मात्र येथे वास्तव्य करताना आपल्या मूळ राज्याला, प्रांताला विसरू नका, आपल्या गावाचा विकास करण्यासाठी मूळ गावांना अवश्य भेटी द्या, असे आवाहन कोश्यारी यांनी केले.

उत्तराखंड राज्यात ‘अॅडव्हेंचर टूरिझम’ विकसित करणार असून १२०० कोटी रुपये खर्च करून टेहरी पर्यटनस्थळ विकसित करण्यात येत असल्याचे सांगून मुख्यमंत्री रावत यांनी उत्तराखंड राज्यात सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. उत्तराखंड भवन राज्यासाठी सन्मानाचे प्रतीक आहे. पर्यटन, उत्पादन, गुंतवणूकदारांसाठी या भवनात कार्यालय बनवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महापौर जयवंत सुतार यांनी उत्तराखंड सरकारला सर्वोतपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.

Protected Content