पोकरा योजनेतील अनुदान शेतकऱ्यांना त्वरित मिळण्यासाठी ग्रामसमित्या स्थापन करा – उपमुख्यमंत्री पवार

मुंबई प्रतिनिधी । नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजना (पोखरा) योजनेत जळगाव व इतर जिल्ह्याचा समावेश असून, केवळ ग्रामसेवक ग्रामसभा घेत नसल्याने ग्राम कृषी संजीवनी समित्या स्थापन करत नसल्या कारणाने या योजनेच्या अनुदानापासून शेतकरी बांधव वंचित असल्याबाबतचे पत्र जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर यांनी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना  दि. २९ जुलै रोजी  दिले होते. या पत्राची तात्काळ दखल घेत उपमुख्यमंत्री ना.पवार यांनी मंत्रालय मुंबई येथे पोकरा योजने संबंधित सर्व अधिकारी यांची आज (दि.२) आढावा बैठक आयोजित केली होती

ग्रामसेवक व कृषी विभागाच्या समन्वयाअभावी नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेतून मिळणाऱ्या अनुदानापासून शेतकरी बांधवाना वंचित राहावे लागत आहे. शेतकरी बांधवांनी ही अडचण ओळखत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांना कृषी व ग्रामविकास विभाग यांच्या समन्वयातून पात्र लाभार्थ्यांना पोकरा योजनेचा लाभ मिळवून देण्यासंबंधी निर्देश देण्यात यावे अशी पत्राद्वारे विनंती केली होती. या पत्राची दखल घेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आयोजित केलेल्या या बैठकीत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर सहभागी झाल्या होत्या.

या बैठकीत उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी कृषी व ग्रामविकास विभागाच्या मुख्य सचिवांकडून ही योजना राबविण्यात येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या व  ज्या ज्या जिल्ह्यांना पोकरा योजना लागू आहे, त्या सर्व जिल्ह्याच्या  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून या योजनेचा आढावा घेतला. लवकरात लवकर पोकरासाठीच्या  ग्राम स्तरावरील ग्राम कृषी संजीवनी समित्या स्थापन करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. 

ही योजना राबविण्यात येणारी मुख्य अडचण म्हणजे  ग्राम पातळीवर असणाऱ्या ग्राम कृषी संजीवनी समितीचा सचिव म्हणून  काम करण्यास ग्रामसेवक संघटनांचा विरोध आहे यावर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी बैठकीत ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी असलेल्या राज्य ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ ढाकणे, सचिव प्रशांत जामोदे यांच्यासमवेत चर्चा करून त्यांचे मत जाणून घेतले व शेतकरी हिताची ही योजना असून कायद्याद्वारे आपण ग्राम पातळीवर असलेल्या समित्यांचे सचिव असतात त्या कारणाने आपल्याला हे काम पार पडावे लागेल, असे निर्देश दिले तुमच्या काही समस्या असतील तर त्या सोडविण्यात येतील असेही यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले. 

यावेळी ग्रामसेवक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपण  ग्राम कृषी संजीवनी समितीचा सचिव म्हणून काम करण्यास तयार असल्याचे सांगितले. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी जळगाव व इतर काही जिल्ह्यातील ग्राम कृषी संजीवनी समित्या स्थापन झालेल्या नसल्याकारणाने त्या भागातील शेतकऱ्यांना लाभ मिळत नसल्याचे मत मांडले. यावर अजित दादा पवार यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून  त्या त्या जिल्हयातील  ग्राम कृषी संजीवनी समित्याचा आढावा घेतला व जिथे जिथे या समित्या स्थापन करण्याच्या राहिल्या आहेत त्या तात्काळ स्थापन करण्याचे निर्देश दिले.

बैठकीत ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यात ग्रामसेवकांची अनेक पदे रिक्त आहेत त्यामुळेसुद्धा अशा योजना राबविण्यात अडचणी असतात ही बाब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निदर्शनास आणून दिली यावर अजितदादा पवार यांनी येत्या काळात लवकरच रिक्त जागांचा आढावा घेऊन  ग्रामसेवकांची भरती करण्यात येईल असे सांगितले.  यावर योजनेचे कार्यान्वयन तात्काळ होण्याकरिता रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी ग्रामसेवकांच्या भरतीमध्ये पोकरा योजनेच्या ग्राम कृषी संजीवनी समितीमध्ये कंत्राटी तत्वावर सामुदायक म्हणून काम करणाऱ्या कृषी पदवीधरांना प्राधान्य देण्यात यावे अशी सूचना मांडली त्यावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भरती वेळी या सूचनेचा विचार केला जाईल असे आश्वासन दिले.

Protected Content