एरंडोल प्रतिनिधी । उपक्रमशील शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांच्या खूनप्रकरणी दोन्ही संशयित आरोपींना पाच दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
किशोर पाटील कुंझरकर खून खटल्यात पोलिसांनी सोनबर्डी येथील वाल्मीक रामकृष्ण पाटील व आबा भारत पाटील या दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांना रविवारी न्यायालयासमोर उभे केले असता दोघांना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दोन्ही जण हे खामखेडा, अंजनविहिरे (ता. धरणगाव) येथे चुलत बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. वाल्मीक पाटील व आबा पाटील या दोघांनीही मद्यपान केले होते. किशोर पाटील व दोन्ही संशयितांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाले. यामुळे कुंझरकर यांना दोघांनी मारहाण केली. त्यानंतर दोघांनी कुंझरकर यांना दुचाकीवर बळजबरीने बसवून पळासदड शिवारात नेले आणि मारहाण केली. मारहाण सुरु असताना पाटील खाली पडले व त्यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. कुंझरकर खाली पडताच दोन्ही संशयितांनी घटनास्थळावरून दुचाकीने पळ काढून सोनबर्डी येथील घर गाठले.
या प्रकरणी दोघांना अटक केल्यानंतर रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रसंगी न्या.नीतेश बंडगर यांनी त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.