कोरोनाबाबत ज्येष्ठांनी घ्यावी विशेष काळजी- डॉ. नरेंद्र ठाकूर

एरंडोल । ज्येष्ठांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण जास्त असल्याने या वयोगटातील नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. याबाबत डॉ. नरेंद्र ठाकूर यांचा हा विशेष लेख

कोव्हीड १९ ह्या आजाराचा संसर्ग करणाऱ्या कोरोना विषाणुपासून जगातील कोणीही व्यक्ती संरंक्षित नाही !
जगातील बलाढ्य राष्ट्राचा प्रमुख असो कि झोपडपट्टीत राहणारा गरीब , उच्चशिक्षित असो कि अंगठाछाप , पुरुष असो कि महिला , लहान मुले असो कि ज्येष्ठ व्यक्ती कोणीही आज कोरोनापासून , तो संसर्ग होऊ नये म्हणून संरंक्षित नाही !
पण हाच कोरोना जर वृद्ध लोकांना झाल्यास मृत्यू अटळच आहे का?
कोरोनाचा संसर्ग ज्येष्ठ नागरिकांना लवकर होतो का ?
कोरोनापासून ज्येष्ठ नागरिकांचा बचाव कसा करायचा ?

कुठल्या वयात किती धोका ?
कोमोरबीडीटी म्हणजे काय ?
मधुमेही व्यक्तींनी काय काळजी घ्यायची ?
ह्या सर्व बाबींची उकल करणारा व गैरसमज दूर करणारा हा लेख !
भारतात कोरोनामुळे आतापर्यंत ७१६४२ व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे ! ऑगस्ट महिन्यात काही दिवस रोज १००० व्यक्ती कोरोनामुळे मृत्युमुखी पडत होत्या ! लोकसंख्येच्या हिशोबाने आपल्या देशाचा मृत्युदर मेक्सिको , स्पेन , अमेरिका ह्या देशांपेक्षा कमी आहे हे जरी खरे असले तरी ज्येष्ठ नागरिकांची हि संख्या भारतात जास्त आहे ! एकूण लोकसंख्येच्या १० टक्केच्या वर ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे तर ग्रामीण भारतात ह्यातील ७० टक्के वृद्ध नागरिक राहतात व महत्वाचे म्हणजे ५ टक्के वृद्ध नागरिक हे एकटे राहतात ! बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक हे विविध आजारांनी अर्थात कोमोरबीडीटी ने ग्रस्त आहेत !

गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीतील कोरोनाचा प्रार्दूभाव व त्यावरील संशोधन अभ्यासानुसार , कोरोनामुळे जे मृत्यू झालेत त्यात ७० ते ८० टक्के व्यक्ती हे ६० वर्षांवरील व कोमोरबीडीटी ( इतर आजार ) ने ग्रस्त असलेले होते !
जगभरातील ज्येष्ठ नागरिकांचा कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यू दराची आकडेवारी पाहिली तर ८० वर्षे वरील वयोगटाचा १५ टक्के , ७० वर्षे वरील वयोगटाच्या ८ टक्के , ६० टक्के वरील वयोगटाचा ३.५ टक्के तर ४० वर्षे वय असलेल्यांमध्ये 0:3 टक्के इतका आहे !
साधारणपणे ६५ वर्षे वयोगटावरील व्यक्तींना ज्येष्ठ नागरिक व ८० वर्षे वयोगटावरील व्यक्तींना अतिवृद्ध असे समझतात !
कोरोनाचा वृद्ध लोकांच्या जीवाला धोका किती आहे ह्यासंबंधी आकडेवारीचा अभ्यास केल्यास दोन बाबी महत्वाच्या वाटतात ! त्या म्हणजे
” वय व इतर आजार “!
अर्थात हे हि लक्षात घेतले पाहिजे कि आपल्या अवतीभवती आतापर्यंत ८० ते ९० वर्षे पार केलेले असे हि नागरिक आहेत ते कोरोनाच्या आजारातून संपूर्णपणे बरे होऊन आयुष्य जगत आहेत !
जागतिक पातळीवर तर १०८ वर्षे वय असलेल्या एका महिलेने जिने १९१८ साली आलेल्या स्पॅनिश फ्लू व २०२० च्या आताच्या कोव्होड १९ ह्या दोन्ही वैश्विक महामारीच्या आजाराला गंभीर परिस्थितीतून यशस्वीपणे तोंड दिलेले आहे !
त्यामुळे कोरोनाचा संसर्ग ज्येष्ठ नागरिकांना लवकर होतो
व सर्वच ज्येष्ठ नागरिक ज्यांना कोरोनाचा संसर्ग होतो ते अतिगंभीर होतात व सर्वच जण मृत्युमुखी पडतात असे म्हणणे हे चुकीचे आहे !
“ह्याचाच अर्थ असा आहे कि
शारीरिक वयापेक्षा जैविक वय महत्वाचे आहे “!

एखादा ८५ वर्षे वयाचा व्यक्ती तो कुठल्याही कोमोरबीडीटी ( इतर आजाराने )ने ग्रस्त नसेल
तर त्यास अतिगंभीर कोरोना होत नाही !व कोरोनामुळे तो सहजासहजी मृत्युमुखी पडत नाही ! त्याऊलट जर एखादा व्यक्तीचे वय ५५ /६० वर्षे असेल पण त्यास कोमोरबीडीटी असेल व ती अनियंत्रणात नसेल तर मात्र ती व्यक्ती कोरोनामुळे अतिगंभीर होऊ शकण्याचे व मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जास्त असते !

” कोमोरबीडीटी म्हणजे नेमके काय “?
एखाद्या कोरोना झालेल्या रुग्णास इतर आजार पूर्वीपासून असतील व शरीरावरील बदलांवर व एकंदरीत कोरोनाच्या प्रवासावर वाईट परिणाम करत असतील अश्या आजारांना कोमोरबीडीटी असे म्हणतात !

“कोमोरबीडीटी चे नेमके आजार कोणते “?
उच्च रक्तदाब , मधुमेह , कर्करोग , रक्त विकार , हृदयरोगी , हृदयशल्यक्रिया किंवा अँजिओप्लास्टी झालेले रुग्ण , मूत्रपिंड विकार ग्रस्त , अवयव प्रत्यारोपित व्यक्ती , फुफ्फुसाचे काही जुनाट आजार असलेले व्यक्ती ,कुपोषित व अतिस्थूल व्यक्ती , एच .आय .व्ही .!

” मधुमेह ( डायबेटीस मेलायटिस )”-
भारत ह्या आपल्या देशाला मधुमेहाची जागतिक राजधानी म्हटली जाते ! तर मधुमेहाला आजारांचा राजा असे हि संबोधले जाते ! शरीराच्या प्रत्येक अंगावर , डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत मधुमेहाचे परिणाम दिसून येत असतात !
आजमितीस भारतातील अंदाजे ७ कोटी नागरिक मधुमेहाने ग्रस्त आहेत ! व नोंद घेण्यासारखे म्हणजे भारतातील बहुतांश मधुमेही रुग्ण हे आपल्या रक्तातील साखरेची लेव्हल हि नियंत्रणात राखण्यात अपयशी ठरत आहेत !
कोरोना चा संसर्ग मधुमेही रुग्णांना इतरांपेक्षा लवकर होतो हे आतापर्यंतच्या शास्त्रीय संशोधनातून सिद्ध झालेले नाही !
पण मधुमेही रुग्णाला कोरोनाचा अतिगंभीर प्रकार होऊन , गुंतागुंत होणे , हॉस्पिटल मध्ये दाखल करावे लागणे , अतिदक्षतागृहांची गरज पडणे , कुत्रिम श्वास देण्याऱ्या यंत्राची गरज पडणे व जंतुसंसर्ग होऊन इतर अवयवांची कार्यक्षमता कमी अथवा ते अवयव निकामी होण्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता इतरांपेक्षा जास्त असते !

कारण मधुमेही रुग्णाच्या शरीरात कुठलाही जंतुसंसर्ग होण्याची व त्याची शरीरात अतिवेगाने पसरण्याची भीती फार असते !
मधुमेही रुग्णामध्ये कुठल्याही आजाराविरुद्ध लढण्यासाठी लागणाऱ्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीची हि कमतरता असते ! त्याचबरोबर मधुमेह हा शक्यतो एकटा नसतो तो त्यासोबत उच्च रक्तदाब , मूत्रपिंड विकार , ह्रदयरोग ह्या आजारांसोबत असतो !
त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णानी ह्या कोरोनाच्या काळात जास्त काळजी घेतली पाहिजे हे नक्की !
पण ह्याचा अर्थ असा हि नाही कि सर्वच मधुमेहींना कोरोना झाल्यास गुंतांगुंत होऊन मृत्यूच होतो ! “ज्या मधुमेही रुग्णांमध्ये साखरेचे प्रमाण हे मागील बर्याच काळापासून अनियंत्रित आहे , व त्यामुळे इतर अवयवांच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला आहे अश्या मधुमेहींना जास्त धोका असतो ”

त्यामुळे मधुमेही रुग्णानी नेहमीच्या आहार , व्यायाम , मनःशांती व योग्य ओषधोउपचाराबद्दल सजग राहून रक्तसाखरेचे प्रमाण कोरोनाच्या संक्रमण काळात नियंत्रित केले पाहिजे !
दर तीन महिन्याच्या अंतराने Hb1AC हि रक्त चाचणी करून
घेतली पाहिजे !

” कोरोनाचे संक्रमण झाल्यास काही निरोगी अर्थात ज्यांना मधुमेह नाही अश्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण अतिप्रमाणात वाढल्याचे हि दिसून आलेले आहे “, त्यामुळे मधुमेही रूग्णामध्ये साखरेचे प्रमाण कोरोना संक्रमण काळात वाढणारच आहे हे लक्षात घेतले पाहिजे !
तर कोरोनापश्चात हि जर उपचारादरम्यान स्टेरॉइड्स सारख्या ओषध वापरले गेले असतील तर रक्तातील साखरेचे प्रमाण मधुमेही रुग्णामध्ये वाढू शकते त्यामुळे कोरोनासंसर्ग मुक्तीनंतर हि काळजी घेणे आवश्यक आहे हे नक्की !

कोरोनाचा आजार हा शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होणे , प्राणवायूचे प्रमाण कमी झाल्यानंतर शरीरात होणारे बदल व त्यामुळे इतर अवयवांवर झालेला परिणाम ,विषारी द्रव्ये शरीरात पसरून होणारा अतिसंसर्ग व रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत वाढ ह्या निरनिराळ्या स्टेज व स्टेप्स च्या माध्यमातून शरीरावर घाला घालत असतो . त्यामुळे कोमोरबीडीटी मध्ये उल्लेख केलेले विविध आजार वा ह्या आजारांसाठी उपचारार्थ लागणारी किमोथेरपी व इम्युनोसप्रेसंट ओषधे ह्यांचा शरीरावर झालेला बदल ह्यांचे पूरक व एकत्रित परिणाम घडत असतात त्यामुळे कोमोरबीडीटीत उल्लेख केलेल्या विविध आजारानी ग्रस्त असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी इतरांपेक्षा अधिक काळजी घेतली पाहिजे !
हृदयरोगी व्यक्ती ह्या कोरोना संक्रमणात्त अतिजोखिम श्रेणीत येतात कारण कोरोना विषाणू हा हृदयावर सुद्धा परिणाम घडवीत असल्याचे सिद्ध होत आहे . हृदयाचे स्नायू कमजोर करणे ,ह्रदयावर तीन पट ताण पडून हृदय बंद पडणे , सायटोकाईन मुळे हृदयधमनीमध्ये अडथळा वाढणे
अश्या प्रकारे कोरोनामुळे हृदयावर विपरीत परिणाम होत आहे !
त्याचप्रमाणे ज्या ज्येष्ठ नागरिकांची पूर्वी ह्रदयशल्यक्रिया किंवा अँजिओप्लास्टी झालेलीं आहे अश्यानी रक्त पातळ करणाऱ्या गोळ्यांचे सेवन नियमित ठेवले पाहिजे !

कोरोनाच्या काळात ज्येष्ठ नागरिकांची नेमकी काय काळजी घेतली पाहिजे “?

(१) ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून घरातील इतर सदस्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे !
वृद्ध लोक जरी घरीच थांबून असले तरी जे ऍक्टिव्ह कुटुंब सदस्य असतात ते घराबाहेर छोट्या मोठ्या कामासाठी घराबाहेर फिरत असतात व तेच ह्या वृद्ध लोकांसाठी कोरोना संसर्गाचे माध्यम बनत असते !
त्यामुळे ज्यांच्या घरात वृद्ध कुटुंब सदस्य आहेत अश्यानी एक लक्ष्मणरेखा त्यांच्या भोवती आखून घेतली पाहिजे , जेणेकरून जवळचा संपर्क टाळता येईल !
जे ओषधी पूर्वीपासून घेत आहेत ती नियमित घेण्यासाठी सतर्क राहिले पाहिजे !
(२) क्षुल्लक कुरबुरींसाठी हॉस्पिटल मध्ये न जाता फॅमिली फिजिशियन किंवा स्पेशालिस्ट डॉक्टरांशी टेलिकन्सल्टिंग च्या माध्यमाने संवाद साधून उपचार घेतले पाहिजे ! केंद्र शासनामार्फत wwwesanjivani.com ह्या संकेतस्थळावर अश्या नागरिकांना योग्य तो सल्ला हि दिला जात आहे !
(३) ज्येष्ठ नागरिकांच्या आहाराकडे दुर्लक्ष झाल्यास शरीरातील पाण्याचे व क्षारांचे प्रमाण कमी जास्त होण्याची शक्यता असते ! कोरोनाच्या महामारीत शरीरातील झिंक व कॅल्शियम ह्याचे प्रमाण राखणेकामी जर आवश्यक वाटले तर बाहेरून पुरवठा करणे आवश्यक असते .
(४) ज्येष्ठ नागरिकांमध्ये , ओस्टिओपोरॉसिस मुळे हाडे ठिसूळ झालेले असतात . त्याचप्रमाणे अचानक चक्कर येऊन पडण्याचे हि प्रकार घडतात .बाथरूम व शौचालय मध्ये एकाकी पडण्याच्या घटना हि घडत आहे , त्यामुळे अतिवृद्ध व्यक्तींनी बाथरूम वापरतांना शक्यतो दरवाजे उघडे ठेवावयास हवे .
जास्त करून मांडीचे वा खुब्याचे हाड फ्रँक्चर होण्याची शक्यता जास्त असते . व असे झाल्यास शल्यक्रिया केल्याशिवाय पर्याय राहत नाही . व त्यासाठी सध्यस्थितीत प्रचंड धावपळ व तणाव कुटुंबाच्या अंगी येतो . व कोव्हीड झाल्यावर जर अश्या शल्यक्रियेस सामोरे जावे लागले तर मृत्यूचा हि धोका वाढतो !
(५) ज्येष्ठ नागरिकांनी घरीच थांबले पाहिजे हे जरी खरे असले तरी आता लॉकडाऊन उठल्यानंतर मास्क घालून घराजवळील गार्डन मध्ये अथवा घरातील आवारामध्ये थोडे फार तरी चाललेच पाहिजे अन्यथा पायामध्ये रक्ताच्या गाठी होऊन अचानक ह्रदय बंद पडण्याची शक्यता असते !
(६) ह्या कठीण काळात ज्येष्ठ नागरिकांशी संवाद तुटल्यामुळे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता हि असते ! चिडचिड व डिप्रेशन ह्याच्या हि तक्रारी वाढू शकतात !
त्यामुळे काळजी घेऊन संवाद ठेवला पाहिजे !
(७) महत्वाचे म्हणजे वृद्ध नागरिकांमध्ये कोरोनाची सुरुवातीचे लक्षणे लवकर ओळखणे व लगेच निदान अन उपचार करणे आवश्यक असते !
वृध्द व अतिवृद्ध लोकांमध्ये कोरोनाची सुरुवातीचे लक्षणे हे इतरांमध्ये आढळून येणाऱ्या लक्षणापेक्षा वेगळी आढळतात . बर्याच वेळा ताप हा दिसतच नाही तर दिवसा जास्त झोप लागणे , रात्री झोप न लागणे ,भूक न लागणे , स्मृतीभंश होणे ,चिडचिड वाढणे अशी असतात !
फुफ्फुसात लागण झाल्यास अचानक बेशुद्ध पडणे ,ओठ निळे पडणे असे हि आढळून येते त्यामुळे वृद्ध व अतिवृद्ध नागरिकांमध्ये कोरोनाची सुरुवातीचे लक्षणे ओळखणे महत्वाचे आहे !
आपल्या भारतीय संस्कृतीत ज्येष्ठांचे स्थान हे आदराचे व सन्मानाचे आहे ! आपल्या प्रत्येकाच्या घरातील ज्येष्ठ व अतिज्येष्ठ सदस्य जे आपले धरोहर आहेत त्यांचे रक्षण करणे हे आपले परम कर्तव्य आहे !
कोरोनाचा प्रकोप जर अशाच वाढत गेला तर मात्र वृद्ध नागरिकांना कुत्रिम श्वास देणारे व्हेन्टिलेटर्स उपलब्ध होणे अडचणीचे ठरणार आहे .
म्हणून ज्येष्ठ व अतिज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण होऊच नये व झाल्यास सुरुवातीचे लक्षणे ओळखून योग्य ते ओषधीउपचार लवकर उपलब्द्ध करून ज्येष्ठ व अतिज्येष्ठ नागरिकांना त्यातून सहीसलामत बाहेर काढण्यासाठी आपण सारे प्रयत्न करू या !
दिवस आपले हे लढायचे
कोरोनाला नष्ट करायचे
पिवळी पाने जपायचे
जीवन सुखी करायचे !

डॉ . नरेंद्र ठाकूर !
नगरसेवक , एरंडोल
सुखकर्ता फाउंडेशन !संपर्क सूत्र -९८२३१३७९३८

Protected Content