रावेर पालिकेत ४० लाखांचा इपीएफ घोटाळा उघडकीस

raver nagarpalika meeting

रावेर प्रतिनिधी । येथील पालिकेच्या विकास कामाचे ठेके घेणार्‍या ठेकेदारांनी तब्बल ४० लाखाचा इपीएफ संबंधित विभागाकडे दोन वर्षापासून न भरल्याने,पालिकेच्या निधीतून ही रक्कम परस्पर वसूल करण्यात आल्याची माहिती नगरसेवक अ‍ॅॅड सुरज चौधरी यांनी आजच्या सर्वसाधारण सभेत उघडकीस आणली.

आज नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली.यावेळी अ‍ॅॅड सुरज चौधरी यांनी पालिकेच्या कामाचे कंत्राट घेणार्‍या ठेकेदारांनी दोन वर्षापासून भविष्य निर्वाह निधीची रक्कम संबंधित विभागाकडे सादर न केल्याने, सभेत विचारणा केली.त्यांनी सभागृहाला माहिती देतांना सांगितले की,ठेकेदारांनी ही रक्कम न भरल्याने,४० लाखाची रक्कम पालिकेच्या फंडातून परस्पर कापण्यात आली. ही गंभीर बाब पालिकेच्या निदर्शनास आल्यावर पालिकेने त्या ठेकेदारांना नोव्हेंबर २०१७ मध्येच ७ दिवसात इपीएफ भरण्याचे नोटीसीद्वारे बजावले होते.मात्र तरीही ठेकेदारांनी या नोटीसीची दखल घेतली नाही. पालिकेने देखील नोटीस बजावल्यानंतर याकडे लक्ष दिले नाही. यामुळे पालिकेची ४० लाखात फसवणूक करणार्‍या ठेकेदारांना पालिकेने मात्र कामाचे ठेके देणे सुरूच ठेवल्याने,पालिका व ठेकेदार यांच्या संगनमताने पालिकेत ४० लाखाचा घोटाळा झाला असल्याचे चौधरी यांनी सभागृहाच्या निदर्शानास आणून दिले.

यावर पालिकेचे मुख्याधिकारी यांनी तत्काळ संबंधित ठेकेदारांच्या सुरक्षा अनामत रक्कमेतून ही रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान आजच्या सभेत ३८ पैकी ३७ विषयांना मंजुरी मिळाली आहे.यावेळी प्रारंभी नगरसेवक अ‍ॅॅड सुरज चौधरी यांनी खासदार रक्षा खडसे यांच्या अभीनंदनाचा प्रस्ताव मांडला. यावर सुधीर पाटील यांनी अनुमोदन दिल्याने हा प्रस्ताव सर्वांनुमते पारित करण्यात आला.

दरम्यान, सभा सुरु होताच शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रल्हाद महाजन यांनी शहरातील पाणी पुरवठ्यासाठी काय उपाय योजना केल्या आहेत याबाबत थेट नगराध्यक्षाना प्रश्‍न उपस्थित केला,यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी सभागृहात काढता पाय घेतला. यावेळी लेखापाल कक्षेतील कर्मचारी यांची वसुली विभागात बदली होण्याच्या प्रस्तावावर देखील त्यांनी हरकत घेवून तो विषय फेटाळून लावला. या बैठकीत उपनगराध्यक्ष असदुल्लाखा, गटनेते असिफ मोहम्मद, नगरसेवक सादिक शेख, सुधीर पाटील,राजेंद्र महाजन,संगीता महाजन,संगीता अग्रवाल,शारदा चौधरी,संगीता वाणी,रंजना गजरे,हमिदाबी पठाण,नुसरत कलीम,प्रकाश अग्रवाल,जगदीश घेटे व नगरसेवक उपस्थित होते.

शहरात टँँकरने पाणीपुरवठा

पालिकेला ऐनपूर येथील जॅॅकवेल मधून प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणून शहरला पाणी केला जातो. मात्र तापी नदीपत्रातील पाणी आटल्याने व त्याठिकाणचा पंप नादुरुस्त झाल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. जॅॅकवेल मध्ये पाणी नसल्याने त्या ठिकाणी बाजूला असलेल्या नदी पात्रातील डोहातील पाणी उचल करण्यासाठी ३० अश्‍वश्क्तीच्या क्षमतेचे दोन फ्लोटिंग पंप टाकून पाणी उचलण्यात येणार आहे. यासाठी जॅॅकवेलमधील नादुरस्त ७५ अश्‍वशक्तीचा पंप देखील आज उशिरापर्यन्त दुरुस्त करून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांनी दिली. गेल्या दोन दिवसापासून रावेरातील काही भागात टॅँकरकरवी पाणी पुरवठा केला जात आहे.या व्यतिरिक्त दोन ठिकाणी नवीन कुपनलिका करण्यासाठी देखील काम सुरु आहे.दोन दिवसात विस्कळीत पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याचे नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांनी स्पष्ट केले.

इपीएफ रोखणारे हे आहेत १४ ठेकेदार

जळगाव येथील अशोक सोनवणे यांनी ७४ हजार १३०,मुक्ताईनगर येथील सचिन भोंबे यांनी २ लाख ३१ हजार ३४२,ठाणे येथील आरएम इंजिनिअर्स २ लाख ९७ हजार ५६१,योगराज कन्ट्रकशन ४ लाख २२ हजार १६५,अष्टविनायक सहकारी बहुउद्देशीय स्वयं संस्था ३ लाख १२ हजार ६६०,जळगाव येथील जनहीन फौंडेशन १ लाख ३३ हजार ६४७,शीतल पुंडलिक पाटील डोलारखेडा ८९ हजार ६६५,वसंत बाजीराव पाटील ४५ हजार ९३८,रावेर येथील राजेंद्र पंढरीनाथ चौधरी २ लाख ९८ हजार१७५ पुन्हा २ लाख ९८ हजार १७५,गोपाल लोहार यांनी १ लाख १० हजार ८६२,रावेर येथील राजेंद्र भादू चिनावलकर यांनी ३ लाख ९८ हजार ६७६,एस.टी.नाईक ६ लाख ७७ हजार ७९५,खिर्डी येथील जितेंद्र जगन्नाथ पाटील १२ लाख ३० हजार ४६८ असा एकूण ४० लाख ७ हजार २२२ रुपयांचा इपीएफ भरण्यात न आल्याने पालिकेच्या फडांतून ही रक्कम परस्पर वसूल झाली आहे

Protected Content