विद्यापीठातील राष्ट्रीय एकता शिबीराला उत्स्‍फूर्त प्रतिसाद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या सहा दिवसांपासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात राष्ट्रीय एकता शिबीराच्या निमित्ताने मिनी भारत प्रकट झाला असून भारताच्या समृध्द संस्कृतीचे अदान प्रदान करणाऱ्या या शिबिराला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. या शिबीराचा उद्या बुधवार ६ डिसेंबर रोजी समारोप होणार आहे.

भारत सरकारच्या युवक व क्रिडा मंत्रालय, रासेयो विभागीय संचालनालय पुणे व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ३० नोव्हेंबर पासून रासेयो राष्ट्रीय एकात्मता शिबिर सुरु आहे.  १० राज्यातील २१० विद्यार्थी शिबिरात सहभागी झाले आहेत.  गटचर्चा, व्याख्यान आणि दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम अशा भरगच्च व्यस्ततेत विद्यार्थी भारताच्या समृध्द सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवित आहे.  विशेष म्हणजे आपल्या राज्यासह इतर राज्यांचे गीत आणि नृत्य देखील सादर करुन विद्यार्थी सांस्कृतिक अदान प्रदान करीत आहेत.  मंगळवार दि.५ डिसेंबर रोजी यजुवेंद्र महाजन यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.  विचार करा, मी करु शकतो हा विश्वास ठेवा, आराखडा निश्चित करा आणि कृती करा असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला.  भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाचा पुरस्कार मनोबल संस्थेला प्राप्त झाल्या बद्दल यजुवेंद्र महाजन यांचा सत्कार करण्यात आला.  दुपारी पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. ऐतिहासिक वारसा आणि जैव विविधता हे विषय स्पर्धेसाठी देण्यात आले.  विभागीय संचालक अजय शिंदे यांनी शिबिरार्थींना माय भारत या युवा पोर्टलची सविस्तर माहिती देऊन सर्व शिबिरार्थींची नोंदणी करुन घेतली.  नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा तो एक भाग आहे.

उद्या बुधवार दि. ६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता या शिबिराचा समारोप होणार आहे.  जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक एम.राजकुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी अध्यक्षस्थानी राहतील. प्र-कुलगुरु प्रा.एस.टी. इंगळे, व्य.प.सदस्य राजेंद्र नन्नवरे यांची उपस्थिती असणार आहे.

Protected Content